सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2020 (16:25 IST)

टाळा प्रसूतिपूर्व नैराश्य

नैराश्याच्या इतर प्रकारांप्रमाणे गरोदरपणातील नैराश्य हा वैद्यकीय विकार आहे. गरोदरपणाच्या काळात होणार्यात हार्मोन्सच्या बदलांमुळे महिलांच्या मेंदूत काही रासायनिक बदल होतात. याचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो आणि त्यांना नैराश्य येते. आईच्या मानसिक अवस्थेचा परिणाम पोटातल्या बाळावर होण्याची शक्यता असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखे नाही.
 
प्रसूतिपूर्व नैराश्याची अनेक कारणे असू शकतात. पीएमडीडी म्हणजे ‘प्रीमेन्स्ट्रूअल डायस्फोरिक डिसऑर्डर' हा सध्याच्या काळातला सर्वसाधारणपणे आढळणारा विकार आहे.
 
यात मासिक पाळी येण्याआधी स्वभावात होणारे बदल, अस्वस्थता, थकवा, मासिक पाळीदरम्यान निराश वाटणे अशी लक्षणे दिसतात. प्रसूतिपूर्व नैराश्याचे हे महत्त्वाचे कारण मानले जाते. ‘प्री मेन्स्ट्रूअल सिंड्रोम' या विकारात पाळी येण्याच्या आठवडाभरआधी स्वभावात बदल होणे, निराश वाटणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे वरचेवर दिसत असतील तर प्रसूतिपूर्व नैराश्याची शक्यता वाढते. नैराश्याचा कौटुंबिक इतिहास, तरूण वयात लादले गेलेले गरोदरपण, कौटुंबिक किंवा सामाजिक पाठिंबा नसणे, कौटुंबिक वादविवाद ही प्रसूतिपूर्व नैराश्याची कारणे असू शकतात. तीव्र स्वरूपाची अस्वस्थता, प्रसूती किंवा गर्भपाताची भीती, अपराधीपणाची भावना, रडावेसे वाटणे, आत्मविश्वासाची कमतरता, चांगले पालक होण्याबद्दलचा अविश्वास, एकटेपणा, कोणीही आपल्याला समजून घेत नसल्याची भावना, झोप आणि आहारासंबंधीच्या समस्या, एकाग्रतेचा अभाव, जबाबदारी वाढणार असल्याने पोटातल्या बाळाचा राग येणे अशी या विकाराची लक्षणे मानली जातात.
 
गरोदरपण लादले गेले असेल किंवा नको असलेले गरोदरपण असेल तर ताण वाढतो. अशावेळी तज्ज्ञांची मदत घेता येऊ शकेल. प्रसूतिपूर्व नैराश्याला प्रतिबंध करणार्या व्यावसायिक आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घेणे, गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याने नैराश्यविरोधी गोळ्या घेणे, गरोदरपणाच्या काळात डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, गरोदरपणाच्या काळात उत्साह वाटत नसेल तर तज्ज्ञांची मदत घेणे हे प्रसूतिपूर्व नैराश्य टाळण्यासाठीचे काही उपाय आहेत.
ओंकार काळे