शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (07:54 IST)

कोरोना लस : दोन वर्षांनंतर लशींच्या साईड इफेक्ट्सबाबत आपल्याला किती माहिती आहे?

corona vaccine
- अँड्रे बर्नाथ
लंडनच्या सायन्स म्यूझियममध्ये एक प्रदर्शन लावण्यात आलं आहे. इथे ठेवलेल्या गोष्टींवरून लक्षात येतं की जगभरात कोरोना लशीची निर्मिती, उत्पादन आणि पुरवठा किती मोठ्या प्रमाणावर झाला होता.
 
या प्रदर्शनात एका कोपऱ्यात काही सिरींज आणि इंजेक्शनची कुपी या गोष्टी एका छोट्या बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
 
त्यांचा वापर 8 डिसेंबर रोजी करण्यात आला होता. कोरोना लशीच्या चाचणीदरम्यान 90 वर्षीय ब्रिटीश महिला मार्गारेट कीनन यांना कोरोनाचे इंजेक्शन देण्याची ही पहिलीच वेळ होती.
 
त्यादिवशीपासून ते आतापर्यंत जगभरात कोरोना लशीचे कोट्यवधी डोस देण्यात आले आहेत. त्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि कोरोनाच्या नवीन प्रकारांपासून संरक्षण करण्यासाठी बूस्टर डोसचाही समावेश आहे.
 
तर मग लसीकरणाच्या या दोन वर्षांच्या कालावधीत आपण काय शिकलो? या काळात लशीच्या परिणामकारकतेबद्दल समोर आलेल्या डेटाचे निष्कर्ष काय आहेत? आत्तापर्यंत, आपण कोरोना लशीच्या दुष्परिणामांबद्दल किती जाणून घेऊ शकलो आहोत?
 
थोडक्यात सांगायचं झालं, तर आतापर्यंतच्या संशोधनानुसार, कोव्हिड-19 विरुद्धच्या या लशीमुळे जगभरात मृत्यूचं प्रमाण कमी झालं. लस वेळेत उपलब्ध झाली नसती, तर या महामारीचे संकट संपूर्ण जगात यापेक्षा कितीतरी पटीने मोठं झालं असतं.
 
दरम्यान, या कालावधीत लशींच्या दुष्परिणामांबद्दलही काही प्रमाणात चर्चा झाली होती. काही निवडक आरोग्य संस्था आणि संस्थांनी लशींच्या गंभीर दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली.
 
हे अपवादाप्रमाणे असले तरीही त्यामुळे लशींचं नेमकं सत्य काय आहे, कोरोना लस खरंच सुरक्षित आहे का, याविषयी माहिती घेणं क्रमप्राप्त आहे.
 
प्रभावी लस
कोरोना लशीचा सर्वात मोठा परिणाम असा की, जगभरात कोव्हिड बाधित रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचं आणि त्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण कमी झालं.
 
कोरोना लस अनेकांपर्यंत पोहोचल्याने गंभीर स्वरुपातील संसर्ग, रुग्णालयांमधील गर्दी आणि मृत्यू या गोष्टी टाळता येऊ शकल्या.
 
या संदर्भात कॉमनवेल्थ फंडने अमेरिकेच्या येल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसोबत एक अभ्यास केला. त्याचा अहवाल 13 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाला. त्यानुसार, कोव्हिड-19 विरोधात कोणतीही लस उपलब्ध झाली नसती तर काय परिस्थिती ओढावली असती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला.
 
या सर्वेक्षणात समोर आलेल्या निष्कर्षानुसार, लस उपलब्ध झाली नसती, तर एकट्या अमेरिकेत 2 वर्षांत 1 कोटी 85 लाखांपेक्षा अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं असतं. तसंच 32 लाख लोक यामध्ये मृत्यूमुखी पडले असते.
 
शिवाय, लस दिल्यामुळे अमेरिकेला 1.3 ट्रिलियन डॉलर्स इतका वैद्यकीय खर्च कमी करावा लागला. रुग्णांची संख्या आणखी वाढली असती तर ही रक्कम संक्रमित लोकांच्या उपचारासाठी खर्च केली गेली असती.
 
सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचं विश्लेषण करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, "अमेरिकेत 12 डिसेंबर 2020पासून 8 कोटी 20 लाख जणांना कोरोना संसर्ग झाला. यापैकी 48 लाख रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. तर त्यापैकी 7 लाख 98 हजार जणांचा मृत्यू झाला.”
 
लोकांना ही लस दिली गेली नसती तर अमेरिकेत दीडपट अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला असता. 4 पटींनी अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागतं. तर 4 पट अधिक लोक मृत्यूमुखी पडले असते.
 
ब्राझिलियन सोसायटी ऑफ इम्युनायझेशनच्या उपाध्यक्ष डॉ. इसाबेल बल्लालाई यांच्या मते, “लस दिल्यामुळे आकडेवारीत खूप फरक पडला.
 
डॉ. इसाबेल यांचा स्वतःच्या ब्राझील देशातही कोरोना संसर्गाचं प्रमाण जास्त होतं. परंतु, परंतु येथील लसीकरण कार्यक्रमाचेही खूप कौतुक झालं.
 
जानेवारी 2021 मध्ये जेव्हा सुरुवातीच्या लसीला मान्यता देण्यात आली तेव्हा ब्राझीलमध्ये कोरोना संसर्गाच्या स्थितीने उच्चांक गाठला होता.
 
ब्राझील सरकारच्या आकडेवारीनुसार, 2021 च्या मार्च ते एप्रिल दरम्यान दररोज सरासरी 72 हजार लोकांना कोरोनाची लागण होत होती. त्यापैकी दररोज सुमारे 3000 लोकांचा मृत्यू होत होता.
 
दिवस सरत गेले तसे अधिकाधिक लोकांचं लसीकरण केलं जाऊ लागलं. त्यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या आटोक्यात आणण्यात यश आलं.
 
लशीच्या दुष्परिणामांबद्दल कोणती माहिती उपलब्ध आहे?
डॉ. इसाबेल बल्लालाई स्पष्ट करतात, "दिवसेंदिवस अधिकाधिक लोकांना लशीचे डोस दिले जात आहेत, आम्हाला लस सुरक्षित आहे, याची खात्री आम्हाला आहे.”
 
गेल्या दोन वर्षांत कोरोना लशीचा लोकांवरील परिणाम याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न संबंधित संस्थांकडून सुरू आहे.
 
लस घेतल्यानंतर लोकांवर लक्ष ठेवण्यापासूनच ते आजारी पडण्यापर्यंत संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे.
 
या कालावधीत लशीचे कोणतेही गंभीर स्वरुपातील साईड-इफेक्ट नसल्याचं ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसला आढळून आलं.
 
मात्र, लस घेणाऱ्या व्यक्तींमध्ये काही लक्षणे मात्र नक्की दिसून आली. ती खालीलप्रमाणे –
 
इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी वेदना
सौम्य ताप आणि थकवा
संपूर्ण शरीरात वेदनांसह डोकेदुखी
वरील लक्षणांसह आजारी असल्यासारखं वाटणे
 यूके सरकारने हे देखील मान्य केलं की आढळून आलेले साईड-इफेक्ट हे अतिशय सौम्य स्वरुपातील आणि जास्तीत जास्त एका आठवड्यांपर्यंत दिसू शकणारे असेच होते.
 
या सौम्य दुष्परिणामांव्यतिरिक्त गंभीर लक्षणे काय आहेत, याविषयीची ताजी आकडेवारी अमेरिकेच्या डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने प्रसिद्ध केली आहे.
 
अॅनाफिलेक्सिज
 
लस घेतल्यानंतर गंभीर अॅलर्जी, ही 10 लाखांपैकी 5 व्यक्तींना अशा प्रमाणात दिसून आली.
 
थ्रोम्बोसिस
 
जॉनसन लस घेतल्यानंतर हे दिसून आलं. याचं प्रमाण 10 लाखास 4 व्यक्ती असं होतं.
 
GBS
 
हेसुद्धा जॉनसन लशीच्या संदर्भातच दिसून आलं. 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमध्ये हे लक्षण आढळलं.
 
मायोकार्डिटिस आणि पेरीकार्डिटिस
 
फायजर कंपनीची लस घेतल्यानंतर हृदयाला सूज येण्याचा प्रकार 12 ते 15 वयोगटात, प्रति दशलक्ष  70 व्यक्तींमध्ये दिसून आला.
 
16-18 वयोगटात हेच प्रमाण प्रति दशलक्ष 106 आणि 18 ते 24 वयोगटात प्रति दशलक्ष 53.4 व्यक्ती असं होतं.
 
CDCच्या अहवालानुसार, “मायोकार्डिटिस आणि पेरीकार्डिटिसने ग्रस्त असलेल्या लोकांवर करण्यात आलेल्या उपरचारांनंतर ते काही दिवसांत बरेही झाले.”
 
त्यामुळे, अनेक अभ्यासांचे परिणाम आणि सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टम्सच्या अहवालांच्या आधारे, या सर्व लशी सुरक्षित आहेत, असं मानलं जाऊ शकतं, असं अहवालात सांगण्यात आलं आहे.   अमेरिकेत 7 डिसेंबरपर्यंत कोरोना लसीचे 65 कोटी 70 लाख डोस देण्यात आले आहेत. लसीकरणानंतर 17 हजार 800 लोकांचा मृत्यू झाला, जो अमेरिकेतील एकूण मृत्यू संख्येच्या 0.0027% आहे.
 
लस घेतल्यानंतर झालेल्या या सर्व मृत्यूंची सखोल चौकशी करण्यात आली. यामध्ये, जेन्सेन लस घेतलेल्यांमध्ये केवळ नऊ मृत्यू झाल्याचे दिसून आले.
 
डॉ. बल्लालाई म्हणतात, “जगात अशी कोणतीही लस नाही ज्यामध्ये कोणताच धोका नाही.”
 
लसीकरणानंतर आता पुढे काय?
2022 मध्ये लस वापरासाठी उपलब्ध असूनही कोरोनासारख्या साथीच्या रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने अनेक आव्हाने अजूनही आहेत.
 
एपिडेमियोलॉजिस्ट आंद्रे रिबास म्हणतात, "जर तुम्ही जागतिक दृष्टिकोनातून याकडे पाहिले तर, अजूनही बरेच देश आहेत जे लसीकरणात खूप मागे आहेत."
 
हैतीसारख्या देशात, फक्त 2 टक्के लोकांनाच लशीचा पहिला डोस मिळाला आहे. याशिवाय, अल्जेरियामध्ये 15%, मालीमध्ये 12%, काँगोमध्ये 4% आणि येमेनमध्ये फक्त 2% लोकांना लशीचा डोस मिळाला.
 
यावर चिंता व्यक्त करताना डॉ. इसाबेल म्हणतात, "ही चिंताजनक बाब आहे कारण जास्त लोकांमध्ये संसर्ग पसरल्यामुळे, विषाणूच्या अधिक घातककारांचा धोका वाढतो."