शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (14:28 IST)

कोरोना व्हायरसचा BF.7 व्हेरियंट किती घातक आहे? त्याची लक्षणं काय आहेत?

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा सुरू झाला आहे. तिथे BF.7 हे नवं व्हेरियंट आढळून आलं आहे.
 
कोणताही व्हायरस जेव्हा म्यूटेट करतो, त्यावेळी तो एक नवीन कॅटेगरी सुरू करत असतो. BF.7 हा दुसरं तिसरं काही नाही, तर आधी आलेला BA.5.2.1.7 च आहे.
 
हा ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट BA.5 पासूनच म्यूटेट होऊन बनला आहे.
 
याच महिन्यात सेल होस्ट अँड मायक्रोब या विज्ञान नियतकालिकेत यासंदर्भात एक लेख छापण्यात आला होता. त्यामध्ये हा व्हेरियंट चार पट अधिक क्षमतेचं व्हायरस आहे, असं त्यामध्ये लिहिलं होतं.
 
याच व्हेरियंटमुळे चीनमध्ये संकट वाढत असल्याचं सांगितलं जातं. या व्हायरसची संसर्ग क्षमता जास्त आहे, तसंच पूर्वीपासून संक्रमित किंवा लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा याची बाधा होऊ शकते, अशाही बातम्या समोर आल्या आहेत. 
 
कोरोना व्हायरसची तीन प्रमुख लक्षणं आहेत. यापैकी एक त्रास होऊ लागला, तरी चाचणी करून घेणं आवश्यक आहे.
 
ओमिक्रॉन व्हेरियंटची लक्षणं काय?
ओमिक्रॉनमध्येही कोरोना संसर्गाची यापूर्वी आढळणारी तीन लक्षणं आढळत असल्याचं युकेच्या NHSने म्हटलं आहे.
 
काही लोकांमध्ये ओमिक्रॉन हा सर्दीसारखा आढळला आहे. घसा खवखवणं, नाक वाहणं आणि डोकेदुखी ही लक्षणं ओमिक्रॉन संसर्ग झालेल्यांमध्ये आढळली.
 
आधीच्या कोव्हिड व्हेरियंट्मध्ये वास आणि चव जाणं, खोकला आणि जास्त ताप ही लक्षणं आढळली होती. आणि याबद्दलही सजग राहणं गरजेचं आहे.
 
ओमिक्रॉन आधीच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरत असला तरी तो तुलनेने सौम्य असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. ओमिक्रॉन संसर्ग झाल्याने गंभीर आजारी पडलेल्यांची वा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलेल्यांची संख्या कमी आहे.
 
ओमिक्रॉन आणि याआधी मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या डेल्टा व्हेरियंटमध्ये कोणती लक्षणं समान आहेत, याचा अभ्यास सध्या संशोधक करत आहेत.
 
ओमिक्रॉन आणि डेल्टामध्ये आतापर्यंत आढळलेली 5 समान लक्षणं आहेत.
 
नाक गळणं
डोकेदुखी
थकवा (सौम्य वा प्रचंड)
शिंका येणं
घसा खवखवणं
यापैकी काही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील आणि तुम्हाला कोरोना संसर्गाची शंका वाटत असेल तर चाचणी करून घेणं उत्तम.
 
कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती?
न थांबणारा खोकला - कधीकधी हा खोकला तासाभरापेक्षा जास्त काळही येऊ शकतो. किंवा 24 तासांत खोकल्याची अशी उबळ तीन वा त्यापेक्षा जास्त वेळा येऊ शकते.
 
ताप - शरीराचं तापमान 37.8C म्हणजे 100.4F पेक्षा जास्त
 
तोंडाची चव, वास येण्याची क्षमता बदलणं - तुमच्या तोंडची चव पूर्णपणे जाते, गोष्टींचा वास येत नाही. किंवा मग या दोन्ही गोष्टी नेहमीपेक्षा वेगळ्या भासू लागतात. वास न येणे, चव न कळणे हीसुद्धा कोरोनाची लक्षणं आहेत.
 
कोव्हिड सगळ्यांमध्ये सारखाच आढळतो का?
नाही. कोरोना व्हायरसचा शरीरातल्या विविध अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि त्याची वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात.
 
40 लाख लोकांच्या माहितीचा अभ्यास करून संशोधकांनी कोव्हिडचे 6 उप-प्रकार ठरवले आहेत.
 
कोव्हिडचे प्रकार
 
तापासारखी लक्षणं, पण ताप नाही : डोकेदुखी, वास न येणं, स्नायूदुखी, खोकला, घसा खवखवणं, छातीत दुखणं, ताप नाही.
 
तापासारखी लक्षणं आणि ताप : डोकेदुखी, वास न येणं, खोकला, घसा खवखवणं, घसा बसणं, ताप, भूक न लागणं.
 
गॅस्ट्रोइंटेस्टाईनल (आतडी आणि पचनसंस्था) : डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, अतिसार, घसा खवखवणं, छातीत दुखणं, खोकला नाही.
 
थकवा (गांभीर्य पातळी 1) : डोकेदुखी, वास न येणं, खोकला, ताप, घसा बसणं, छातीत दुखणं, थकवा येणं.
 
गोंधळल्यासारखं वाटणं (गांभीर्य पातळी 2) : डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, खोकला, ताप, घसा बसणं, घसा खवखवणं, छातीत दुखणं, थकवा, गोंधळून जाणं, स्नायूदुखी
 
पोट आणि श्वसनयंत्रणा (गांभीर्य पातळी 3 ) : डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, ताप, खोकला, घसा बसणं, घसा खवखवणं, छातीत दुखणं, थकवा, गोंधळल्यासारखं वाटणं, स्नायूदुखी, छाप लागणं, अतिसार, पोटदुखी
 
उलट्या होणं, अतिसार वा पोट बिघडणं आणि पोटात दुखणं ही लक्षणं लहान मुलांमध्ये आढळल्यास ती कोरोना व्हायरसच्या संसर्गाची असू शकतात, असं संशोधक सांगतात.
 
लहान मुलांना जर उलट्या, जुलाब होत असतील, पोटात कळा येत असतील तर ती कदाचित कोरोनाची लक्षणं असू शकतात असा दावा ब्रिटीश संशोधकांनी केलाय.
 
खोकला झाला, म्हणजे कोव्हिड आहे का?
फ्लू आणि इतर काही संसर्गांची लक्षणं आणि कोव्हिडची लक्षणं यात बरंचसं साधर्म्य आहे. त्यामुळेच तुम्हाला आढळणारी लक्षणं ही सर्दीची, फ्लूची की कोव्हिडची यातला फरक समजून घ्या. शंका असल्यास चाचणी करून घेणं, कधीही चांगलं.