गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By वेबदुनिया|

आयपीएलः सेमीफायनलमध्ये कोण जाणार?

आयपीएल स्पर्धेच्या पंधराव्या दिवशी दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना रंगतदार ठरेल. या स्पर्धेच्या सुरवातीला सर्व संघ तुल्यबळ आहेत, असे बोलले जात होते. पण कोणता संघ कोणाला हरवेल हे काही सांगता येत नाही, हे आतापर्यंतच्या स्पर्धेतून दिसून आले आहे.

एकीकडे क्रिकेट स्टार्सचा भरणा असलेला संघ मजबूत असल्याचे बोलले जात होते. पण त्याचवेळी शेन वॉर्न वगळता कुणीही स्टार खेळाडू नसलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने दुसऱ्या क्रमांकावर धडक मारून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा संघ आतापर्यंत एकच सामना हरलेला असून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वॉर्न या स्पर्धेत दुहेरी भूमिकेत आहे. तो कर्णधाराबरोबरच प्रशिक्षकाचीही भूमिका पार पाडत आहे. ज्या पद्धतीने कोचिंग केली आहे, ते पाहता त्याच्या संघातील खेळाडूंची कामगिरी झपाट्याने सुधारली आहे.

त्याचवेळी 'स्टार्स'च्या समावेशाने लखलखत असलेल्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्स, मुंबई इंडियन्स व डेक्कन चार्जर्स या संघांनी आतापर्यंत एकच सामना जिंकलेला आहे. हे तीनही संघ विजेतेपदाचे दावेदार होते. पण अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात ते कमी पडले. त्यामुळे ही तिन्ही संघ 'डेंजर झोन'मध्ये आहेत. अर्थात सेमी फायनलमध्ये पोहोचण्यास ते बाद ठरतील असे आताच म्हणणे घाईचे ठरेल. कारण त्यांच्याकडे कामगिरी सुधारण्यासाठी संधी आहे.

आयपीएलमध्ये आठ संघ आहेत. पहिल्या राऊंडमध्ये चार संघांना बाहेर जावे लागेल. हे चार संघ कोणते हे सांगणे थोडे अवघड आहे. मात्र, आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारे सेमी फायनलमध्ये कोण जाऊ शकेल याचा अंदाज थोडा फार का होईना बांधता येईल.

चेन्नई सुपर किंग्ज- या संघाने चारही सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत हा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने सर्व सामने रूबाबात जिंकले आहेत. एकही सामना जिंकण्यात अडचण आलेली नाही. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघाचे अतिशय 'डोकेबाज' नेतृत्व केले आहे. त्यामुळे हा संघ सेमीफायनलमध्ये जाणार यात काही शंका नाही.

राजस्थान रॉयल्स- पाच सामन्यांपैकी चार सामने या संघाने जिंकले आहेत. गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिला सामना हरल्यानंतर त्या चुकांमधून धडा घेत या संघाने कामगिरीत जबरदस्त सुधारणा केली आहे. त्यांचे कौतुकच करावे लागेल. तरूण खेळाडू असलेल्या या संघाला सेमीफायनलमध्ये जाण्यापासून रोखणे शक्य नाही.

दिल्ली डेअरडेव्हिल्स- वीरेंद्र सेहवागच्या या संघाचा नेट रनरेट सगळ्यांत चांगला आहे. संघ कमजोर नाही. गुणतालिकेत सध्या तो तिसर्‍या क्रमांकावर आहे. हा संघ कोणत्याही संघाला हरवू शकतो. त्यामुळे हा संघ सेमीफायनलमध्ये जाईल, हे स्पष्ट आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब/ कोलकता नाईट रायडर्स- या स्पर्धेतील सेमी फायनलमधील चौथा संघ या दोन पैकी एक असेल. या पैकी जो संघ चांगली कामगिरी करेल, तो सेमीफायनलमध्ये जाईल. किंग्ज इलेव्हन पंजाबचे पाच सामन्यातून सहा गुण आहेत. कोलकता नाईट रायडर्सचे तेवढ्याच सामन्यातून चार गुण आहेत. कोलकता नाईट रायडर्सची कामगिरी पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत मात्र ढासळती झाली आहे.