ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लॅन मॅकग्रथ एकदा म्हटला होता, ‘’जयसूर्या जगातला असा फलंदाज आहे, ज्याने फलंदाजीला नवी दिशा दिली. त्याने सुरू केलेल्या मार्गावरून नंतर जग चालायला लागले.’’ १९९६ च्या विश्वकरंडक स्पर्धेत जयसूर्याने आपल्या नव्या स्फोटक फलंदाजीची सुरवात केली आणि एकदिवसीय सामन्याचे चित्रच बदलून गेले. जयसूर्याची फलंदाजी एवढी स्फोटक होती, की त्यावेळच्या सर्व गोलंदाजांना त्याने आपल्या बॅटीने फोडले होते.
सनथ थेरान जयसूर्याचा जन्म ३० जून १९६९ ला झाला. त्याचे नाव ज्याने ठेवले त्याला आपण किती दूरदृष्टीने ठेवले याची कल्पनाही नसेल. हा पुढे सूर्यासारखा तळपेल आणि जय त्याच्या नशिबी असेल हे त्याला कळले तरी असेल का? वयाच्या विसाव्या वर्षापासून श्रीलंकेच्या संघात असलेल्या जयसूर्याच्या नावावर आज विक्रमांची रास आहे. वन डे क्रिकेटमधला तो बारा हजारी मनसबदार आहे. तीनशे विकेट त्याच्या खिशात आहेत. विशेष म्हणजे ट्वेंटी-२० क्रिकेटमधला तो सर्वांत वयस्कर खेळाडू आहे. पण तरीही तो सर्वांत धोकादायकही आहे.
जयसूर्या खर्या अर्थाने पहिल्यांदा तळपला तो १९९६ मधील विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान. त्यानंतर तो आजपर्यंत तळपतोच आहे. जगातील भल्या भल्या गोलंदाजांना आजही त्याच्या फटक्याचे चटके बसताहेत. त्याच्यामुळे क्रिकेट वेगवान बनले. पहिल्या पंधरा षटकांना अतिशय महत्त्व आले आणि बॅटचे महत्त्व हातोड्याइतके आहे, हे पटले. म्हणूनच या वर्षी श्रीलंकेला विश्वकरंडक मिळवून देण्यात जयसूर्याचा वाटा फार मोठा होता.
जयसूर्या नाव घेतलं की प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज कापायचे. कारण जयसूर्या त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडायचा. त्यामुळेच दहा षटकांत शंभर धावा फलकावर लागायच्या. अनेकदा पंधराव्या षटकापर्यंत त्याचे शतक पूर्ण व्हायचे. एवढा आक्रमक आणि वेगवान खेळ असल्याने गोलंदाजाच्या छातीत धडधडत नसले तरच नवल. त्याच्या या पराक्रमामुळेच १९९७ मध्ये विस्डेनचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार त्याला मिळाला होता.
संयुक्त राष्ट्रसंघटनेने गुडविल एंम्बेसेडर म्हणून नियुक्त केलेला जयसूर्या जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. यशस्वी क्रिकेटपटू असतानाही सामाजिक भान त्याने जपले आहे. श्रीलंकेत त्याने एचआयव्ही-एड्सविरोधात जागृती मोहीम चालवली आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघटनेने त्याला हे मानाचे पद देऊन त्याचा सन्मान केला आहे.