एकदा एका भरपूर लाच खाऊन गब्बर झालेल्या श्रीमंत अधिकार्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्या विषयीचा खटला न्यायालयात चालू होता. त्यासाठी घेतलेल्या खास सभेकरिता इसापला बोलावण्यात आले होते. या विषयावर बोलण्याकरिता इसाप उभा राहिला आणि म्हणाला :
''मी तुम्हाला एक गोष्टच सांगतो. ती ऐका आणि मग तुम्हाला जो काही न्याय द्यायचा तो द्या. '' इसापने आपल्या गोष्टीला प्रारंभ केला. एकदा एक चिखलाने भरलेल्या नदीतून जात असता एक कोल्ह्याच्या अंगाला अनेक जळवा चिकटल्या व त्या त्याच्या रक्तावर तुटून पडल्या. जळवांचे रक्तशोषण स्थिती समोरून येणार्या एका साळूने पाहिली. ती म्हणाली, ''कोल्होबा, या जळवांच्या चावण्याने तू अगदीच बेचैन झाला आहेस. उपटून काढू का तु्झ्या अंगावरच्या जळवा? आत्ता काढून टाकते भराभर. बोल'' कोल्हा विव्हळत म्हणाला,
''नको ग बाई नको! अंग, आता या माझ्या अंगावरच्या जळवा माझं रक्त पिऊन तट्ट फुगलेल्या आहेत. आता त्या अधिक रक्त पिऊच शकणार नाहीत. पण तू त्यांना उपटून काढलंस ना, तर दुसर्या भुकेनं वखवखलेल्या जळवा माझ्या अंगाला चिकटतील आणि माझं सगळंच रक्त पिऊन टाकतील.
मित्रांनो, ऐकलीत ना माझी गोष्ट. या जळवांप्रमाणे हा माणूस आता अधिक पैसा खाणार नाही, परंतु त्याच्या जागी तुम्ही दुसरा नेमाल तर तो मात्र पैसा खाण्याच्या नव्या वाटा शोधून काढून अधिक शोषण करील. तेव्हा मुळातच लाच खाण्याचे सर्व मार्ग कसे बंद करता येतील ते पहा. केवळ व्यक्ती बदलून लाचलुचपत थांबणार नाही. शोषण कमी होणार नाही. उलट ते अधिक वेगाने होत राहील. ''