1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (17:34 IST)

बोध कथा : वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून ठरवायची नसते

एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्‍या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.
 
तात्पर्य : कोणत्याही वस्तूची किंमत तिच्या मोठय़ा आकारावरून ठरवायची नसून, तिच्या उपयोगावरून ठरवायची असते.