जादूगाराचा अहंकार
एकदा राजा कृष्णदेव रायांच्या राज्यसभेत एक जादूगार आला. त्याने आपल्या जादूने सर्व लोकांना आश्चर्यात टाकले. जाताना राजाने त्याला बऱ्याच भेटवस्तू दिल्या त्या घेऊन त्याने सर्वांना आपल्या कलेच्या अहंकाराच्या जोरावर आव्हान दिले.
आहे का कोणी या राज्यसभेत जे मला स्पर्धा देऊ शकेल? आहे का कोणी जे माझ्या पेक्षा चांगल्या युक्त्या करू शकेल? हे उघड आव्हान ऐकून सर्व राज्य दरबारी शांत झाले पण तेनालीरामाने त्याच्या आव्हाहनाला स्वीकारले कारण त्यांना त्या जादूगाराच्या अहंकाराला तोडायचे होते.
ते त्वरितच उठले आणि त्यांनी जादूगाराला म्हटले की मी आपले आव्हान स्वीकार करतो आणि आता मी आपल्याला आव्हान देतो की जी युक्ती मी डोळे मिटून करू शकतो ती आपण उघड्या डोळ्याने देखील करू शकणार नाही. काय आपल्याला माझे हे आव्हान मान्य आहे? जादूगार तर पूर्णपणे आपल्या अहंकारात बुडलेला होता. त्याने त्वरितच तेनालीरामाच्या या आव्हानाला मान्य केले.
तेनालीरामने आचारीला बोलविले आणि त्याच्या कडून तिखट मागविले. आता तेनालीने आपले डोळे मिटले आणि त्याच्यावर तिखट फेकले. थोड्यावेळा नंतर त्यांनी तिखटाची पूड झटकून कपड्याने पुसून स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुऊन घेतला. नंतर जादुगाराला म्हणाले की आता आपण हे उघड्या डोळ्याने करून आपल्या जादूचे कौशल्य दाखवावे.
अहंकारी जादूगाराला आपली चूक लक्षात आली. त्यांनी तेनालीरामाची हात जोडून माफी मागितली आणि राज्यसभेतून निघून गेला. राजा कृष्णदेव राय आपल्या हुशार मंत्री तेनालीरामाच्या या युक्तीने खूप प्रभावित झाले. त्यांनी तेनालीरामला भेटवस्तू देऊन सन्मानित केले आणि राज्याबद्दलच्या त्यांचा असणाऱ्या राज्यभक्तीसाठी त्यांचे आभार मानले.