गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (08:11 IST)

पांडुरंग सदाशिव साने पुण्यतिथी

साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी ते खोताचे काम ते करीत होते. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.  
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
 
1928 साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार प्रभाव होता. स्वतःच्या जीवनात देखील ते खादी वस्त्रांचाच वापर करीत असत. समाजातील जातीभेदाला, अस्पृश्यतेला, अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी कायम विरोध केला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या साने गुरुजींनी 1930 साली शिक्षकाची नौकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली. 
 
1942 च्या चळवळीमधे भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले, धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली.
लहान मुलांच्या बाल मनावर चांगल्या संस्कारांची बीज पेरली जावीत म्हणून गुरुजींनी विपुल लेखन केलं. आपल्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम होतं, हे त्यांनी लिहिलेल्या “श्यामची आई” या पुस्तकातून आपल्याला कळत, जाणवतं. श्यामची आई या पुस्तकातून त्यांनी आपल्या आईच्या सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत.  साने गुरुजींचं मन अत्यंत भावनाप्रधान आणि संवेदनशील होतं त्यामुळे आईने ज्या सदभावना त्यांच्यात रुजवल्या त्याची वाढ त्यांच्यात वेगानं झाली.
 
अमळनेर, धुळे आणि नाशिक इथं काही काळ त्याचं वास्तव्य होतं. पुढे खान्देशला त्यांनी आपली कर्मभूमी बनविलं. प्रांताप्रांतातील भेदभाव दूर व्हावा आणि सर्वत्र बंधूप्रेमाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी साने गुरुजींनी आंतरभारती ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. साहित्य संमेलनात तशी इच्छा त्यांनी बोलून देखील दाखवली होती.
 
त्याकरता त्यांनी पैसा गोळा केला होता, रवीन्द्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आंतरभारती संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मनोदय होता.
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.
 
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली.