रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By आय. वेंकटेश्वर राव|

श्री लक्ष्मी नरसिंह चंदनोत्सव

WD
अक्षय तृतीयेच्या पवित्र दिनी सिंहाचल पर्वताचा थाट काही आगळाच असतो. या दिवशी या पर्वतावर विराजमान झालेल्या श्री लक्ष्मीनरसिंहाच्या मूर्तीला चंदनाचा लेप चढविला जातो. या देवाची मूर्ती नेमकी कशी आहे, हे या दिवशी कळते. अकराव्या शतकात बांधलेले हे मंदिर देशातील काही मोजक्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.
सिंहाचल म्हणजे सिंहाचा पर्वत. विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंहाचे हे निवासस्थान आहे. भक्त प्रल्हादाला पर्वतावरून ढकलून समुद्रात फेकले जात असताना भगवान नरसिंह रूपाने येथे धावून आले होते, अशी कथा आहे.
प्रल्हादाने याच ठिकाणी नरसिंहाचे पहिले मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. प्रल्हादाच्या विष्णूभक्तीने संतप्त झालेल्या पित्याने कुठे आहे तुझा भगवान असे विचारले असता प्रल्हादाने या खांबातही भगवान आहे, असे सांगितले होते. त्यावर त्याच्या पित्याने त्या खांबालाच लाथ मारली आणि तिथून नरसिंह प्रकटले आणि त्यांनी प्रल्हादाच्या पित्याचा संहार केला. त्यानंतर मग प्रल्हादाने नरसिंहाचे मंदिर बांधले. परंतु, कृतयुगानंतर या मंदिराची उपेक्षा झाली. मग लुनार वंशातील पुररवाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
WD
पुरूरवा ऋषी एकदा पत्नी उर्वशीबरोबर हवाई मार्गे चालले होते. त्यावेळी त्यांचे विमान आपोआप दक्षिणेतील सिंहाचल क्षेत्रात गेले. तेथे त्यांनी नरसिंहाची मूर्ती जमिनीत गाडली गेल्याचे पाहिले. मग त्यांनी मूर्ती काढून तिची साफसफाई केली. त्याचवेळी या मूर्तीला साफ करण्याऐवजी तिला चंदनाचा लेप लावावा अशी आकाशवाणी झाली.
या मूर्तीवरील चंदनाचा लेप वैशाखातील तिसर्‍या दिवशी काढावा असेही आकाशवाणीत सांगण्यात आले. त्यानंतर मग आकाशवाणीप्रमाणे या मूर्तीला चंदनाचे लेप चढविण्यात आला. मग वर्षातून एकदा हा लेप काढण्यात येऊ लागला. तेव्हापासून नरसिंहाच्या मूर्तीची सिंहाचलावरच प्रतिष्ठापना करण्यात आली.
WD
मंदिराचे महत्त्व- हे मंदिर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणपासून सोळा किलोमीटरवर आहे. जगातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून आठशे फूट उंचीवर ते वसले आहे.

मंदिरापर्यंत जाण्याचा मार्गही रम्य आहे. अननस, आंबा आदी फळझाडांच्या गर्द सावलीतून हा मार्ग जातो. रस्त्यातून जाताना या सावलीत बसण्यासाठी मोठे दगड आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायर्‍या आहेत.
शनिवार व रविवारी भाविक मोठ्या प्रमाणावर या मंदिरात येतात. एप्रिल व जून हा काळ दर्शनासाठी उत्तम मानला जातो. चैत्र शुद्ध एकादशीला वार्षिक कल्याणम व वैशाखात तिसर्‍या दिवशी होणारी चंदन यात्रा हे प्रमुख सण आहेत.
कसे जाल?
रस्ता मार्ग- विशाखापट्टणम हैदराबादपासून ६५० किलोमीटर व विजयवाडापासून ३५० किलोमीटर आहे. येथे येण्यासाठी हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, चेन्नई व तिरूपतीहून नियमित बससेवा आहेत.
रेल्वेमार्ग- विशाखापट्टण हे चेन्नई-कोलकता या रेल्वे लाईनवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. शिवाय नवी दिल्ली, चेन्नई, कोलकता व हैदराबादशी ते जोडले गेलेल आहे.
हवाई मार्ग- हैदराबाद, चेन्नई, कोलकता, नवी दिल्ली व भुवनेश्वरहून येथे येण्यासाठी विमानसेवा आहे. चेन्नई, नवी दिल्ली व कोलकताहून इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट आठवड्यातून पाच दिवस उपलब्ध आहे.