रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. धर्मयात्रा
  3. धर्मयात्रा लेख
Written By
Last Updated : सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (15:51 IST)

इंदूर : प्रेक्षणिय स्थळ

इंदूर शहराला फार मोठा इतिहास आहे. या संस्थानाचे संस्थापक मल्हारराव होळकर (१६९४ ते १७६६) यांनी आपल्या मामाच्या मदतीने पेशव्यांच्या सन्यात प्रवेश केला. इंदूर हे मध्य प्रदेशातील एक मोठे संस्थान. इंदूर म्हटले की, मराठी इतिहासांतील कितीतरी जुन्या आठवणी जाग्या होतात. इंदूर हे नाव इंद्रेश्वर मंदिरावरून पडलेले आहे. हे मंदिर  १७ व्या शतकातील आहे. सरदार मल्हाराव होळकर, अहिल्याबाई यांच्यामुळे इंदूर महाराष्ट्राला जवळचे वाटते. भौगौलिकृष्टयाही इंदूर महाराष्ट्राला जवळ आहे. इंदूरच्या उत्तरेला ग्वाल्हेर, पूर्वेला देवास व भोपाळ, दक्षिणेला पूर्वीचा मुंबई इलाखा आणि पश्चिमेला बडवानी व धार ही शहरं आहेत.
 
त्याने पेशव्यांकडून मनसब, माळव्याची जहांगीर व नर्मदेच्या उत्तरेकडील मराठयांच्या हालचालींचं सेनापतीपद हे अधिकार क्रमाक्रमाने मिळवलं. त्याच्या हयातीतच त्याचा मुलगा खंडेराव मृत्यू पावल्याने खंडेरावाचा मुलगा मालेराव यास गादीवर बसवण्यात आलं. तथापि मालेरावाच्या अकाली निधनामुळे खंडेराव यांच्या पत्नी अहिल्याबाई यांनी १७५४ ते१७९५ पर्यंत इंदूर संस्थानाची जबाबदारी सांभाळली. धार्मिकता, औदार्य, देवळांचे जीर्णोद्धार, न्याय व राज्यकारभाराची उत्तम व्यवस्था यासाठी अहिल्याबाई इतिहासात प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंनीच इंदूर शहराची भरभराट केली. २० एप्रिल १९४८ रोजी हे संस्थान मध्य भारत संघात विलीन झाले.
 
भोपाळ ही मध्य प्रदेशची प्रशासकीय राजधानी असली तरी सांस्कृतिक राजधानी आहे ती इंदूर. स्थानिक भाषेत इंदौर. मुंबई-पुण्याहून १४ तासांचा ट्रेनचा प्रवास करून इंदूर गाठता येते, तर औरंगाबाद, जळगाव येथून रात्रभराच्या बसच्या प्रवासानंतर आपण इंदूरला पोहोचतो. मुंबई-पुण्याहून इथं विमानसेवाही आहे. इंदूरचा विमानतळ हा भारतातला एकमेव असा विमानतळ असावा, की जिथून मुख्य शहर फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
 
मुंबईहून संध्याकाळी अवंतिका एक्स्प्रेसमध्ये बसायचं, सकाळी येणा-या स्थानकांवर खास ताजे इंदुरी पोहे खायचे की साडेनऊच्या आत आपण इंदूरला पोहोचलेले असतो. ट्रेन शिवाय आता बससेवाही सुरू झाली आहे.  
 
इंदूरची खाद्यसंस्कृती तर प्रसिद्ध आहे. इथले लोक खाण्यासाठी जगतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंदूरच्या खवय्येपणाचे किस्से सर्वदूर पसरले आहेत आणि त्यात कणभरही अतिशयोक्ती नाही, हे इथे आल्या आल्या कळतं. त्याचबरोबर खाणं हे वेळेला बांधील नाही, त्यामुळे खायचं केव्हा हा प्रश्न पडायचं कारण नाही. इंदुरी लोकांचा दिवस सुरू होतो (आणि संपतोही) तो पोहे आणि जिलबीने. जिथे जाल तिथे पोहे दिसतात. केव्हाही गेलात तरी गरम पोहे मिळतात. या पोह्यावर विविध प्रकारची शेव, मसाला घालून ते दिले जातात. काही ठिकाणी जिलेबीही मिळते. सकाळी नाष्टा म्हणजे पोहे, हे इथं समीकरण आहे. एवढया प्रचंड प्रमाणात पोहे खपणारं हे भारतातील एकमेव शहर असावं. या विधानात कणभरही अतिशयोक्ती नाही.
 
इंदूरमध्ये आलात आणि बडा सराफ्याला गेला नाहीत तर तुम्ही इंदूर पाहिलंच नाही, असं म्हटलं जातं. कारण सराफा हा इंदूरच्या खाद्यसंस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे. इथं ‘जिवंत’ या शब्दाला फार अर्थ आहे. इंदूर शहराच्या मधोमध होळकरांचा जो राजवाडा आहे त्याच्या मागच्या भागात अतिशय दाटीवाटीने असलेली दुकानं आहेत. यात कपडे, सराफांची दुकानं अर्थातच जास्त आहेत. थोडं पुढे गेल्यास सराफ बाजारच लागतो. या बाजारालाच सराफा म्हणतात. पण हा सराफा सोन्यापेक्षाही तेथील खाद्यसंस्कृतीसाठीच जास्त प्रसिद्ध आहे.
 
सराफी दुकानं बंद झाली की, रात्री साडेनऊनंतर विविध खाद्यपदार्थाची दुकानं लागण्यास सुरुवात होते. ही दुकानं रात्रभर उघडी असतात. तिथली स्पेशालिटी असलेले गराडू, साबुदाणा खिचडी, कचोरी, दहीवडा, गुलाब जाम, गोलगप्पा अशी यादी न संपणारी आहे. पोटात जेवढी जागा असेल आणि विविध चवी घेण्याची जिभेची तयारी असेल तेवढे विलक्षण चवींचे पदार्थ इथं मिळतात. या भागात रात्रभर चहलपहल असते आणि ही काही यात्रेतल्यासारखी एका रात्रीची दुकानं नसतात, तर वर्षातील ३६५ दिवस हे चित्र असंच असतं. सराफा कधीही झोपत नाही. छप्पन भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.
 
पुढील पानावर बघा इंदूरचे प्रेक्षणीय स्थळे 
खजराना गणपतीचे मंदिर इंदूरचे खजरराना हे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1735 मध्ये झाली. राजमाता अहिल्यादेवीच्या कालखंडात येथील पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात येवून विघ्‍नहर्त्याने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली, अशी मान्यता आहे. 
 
गीताभवन - ही वास्तू शहरातच आहे .सिंधमधून फाळणीच्या वेळी  भारतात आलेल्या एका सिंधी गृहस्थाने ही वास्तू उभारली आहे . हे मंदिर  भव्य आणि सुंदर आहे .प्रवेशद्वार  दक्षिणेतील  गोपुराच्या पद्धतीचे आहे. अनेक देवतांच्या  सुंदर मूर्तीची मंदिरे आहेत .सभागृहात  इतिहासकालीन दृश्यांची तैलचित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वार  चार पूर्णाकृती दगडांवर उभारलेले आहेत .
 
जुना राजवाडा - हा वाडा होळकर घराण्याचा असून सात मजली आहे.
 
मल्हारी मार्तंड मंदिर - शिवलिंग, मध्यभागी गणेशमूर्ती व नटराजमूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.
 
इंदूरची बिजासन देवी - वैष्णोदेवीप्रमाणे येथेही देवी पाषाणातील पिंडरूपात आहे. मंदिराच्या पुजार्‍यांच्या मते, या पिंडी स्वयंभू आहेत. त्या येथे कधीपासून आहेत, याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही. आम्हीच अनेक वर्षांपासून त्यांची पूजा करत आहोत, असे पूजारी सांगतात. 
 
लालबाग महाल -  हा खूप मोठ्या  विस्ताराचा राजवाडा आहे.पण बाहेरून अतिशय सामान्य अशी वास्तू वाटते. आता होळकर घराण्यातील  कोणीही व्यक्ती तेथे राहत नाही .शेवटच्या वंशज (उषा राजे मल्होत्रा)विवाहानंतर मुंबईला १९६० च्या सुमारास  स्थायिक झाल्या .त्यांनतर महालाची देखभाल पुरातन तत्व विभागाकडे आली आहे .
 
गोमतगिरी - जैन तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर आहे. येथील भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती आहे.
 
नखराली ढाणी - इंदूर ते महू रस्त्यावर राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आहे. मात्र त्यात भोजनही समाविष्ट आहे. येथे राहण्याचीही व्यवस्था आहे.
 
अन्नपूर्णा मंदिर - येथे प्रशस्त वेदपाठशाळा (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तिरूप वेद आहेत. येथील अन्नपूर्णा देवीची यात्रा त्र्यंबकेश्वर येथे जाते. ह्या मंदिराची बांधणी मथुरेच्या मीनाक्षी मंदिरासारखी आहे. प्रवेशद्वारात चार पूर्णाकृती हत्तिया आहेत व द्वार प्लास्टरचे आहे दगडाचे नाही. मंदिरात अन्नपूर्णादेवीची मूर्ती आहे व इतर काही छोटी मंदिरे आहेत . 
 
काच मंदिर - संपूर्ण इमारत बाहेरच्या बाजूला रस्त्यावरून( आत येण्याच्या भाग सोडून)प्रवेशद्वारापासून आत सर्वत्र रंगीत काचांच्या तुकड्यांची बांधलेली आहे. हुकूमचंद शहा या गृहस्थाने ती बांधली आहे. यात भिंतीवर, छतावर मूर्ती आहेत. त्यातून महाविराच्या  जैन धर्मातील दृश्ये आहेत. चित्रात बारकावे स्पष्ट दिसतात. (फोटो काढायला परवानगी नाही )ही वास्तू गावातच भर वस्तीत आहे. 
 
छत्री - खान नदीच्या  काठावर होळकर घराण्यातील व्यक्तींच्या समाध्या येथे बांधल्या आहेत.मराठी वास्तुकलेचा यात उत्कृष्ठ नमुना बघायलामिळतो..
 
क्लाथ मार्केट - खुद्द इंदूरमध्ये सुती कपडे, साडया अतिशय स्वस्त आणि विपुल प्रमाणात मिळतात. त्यामुळे जाताना एक मोठी रिकामी पिशवी घेऊन जाणं सोयीस्कर.
 
इंदूरचे महाराष्ट्र मंडळ व त्यांचे ग्रंथालय
 
बाकी गावात पाहण्याजोगी एक-दोन मंदिरं आहेत. मांडू तिथून जवळ आहे. मांडूला रात्रीची वस्ती केल्यास किल्ला छान फिरून होतो. मांडूला शक्यतो पावसाळ्यानंतर, हिवाळ्यात जावं. तिथला उन्हाळा सहन होण्याजोगा नसतो. इंदूरपासून तासाभराच्या अंतरावर कुमार गंधर्वाचं देवास आहे. जमल्यास तिथे चक्कर मारावी. जवळ उज्जनला महांकाळेश्वराचं मंदिर आहे. ते बारा ज्योतिर्लिगांपैकी एक आहे. मंदिर वेगळ्याच धाटणीचं, नक्की पाहण्याजोगं आहे.  
महाराष्ट्राबाहेरचं मराठी जग पाहायचं असेल तर इंदूरला नक्की भेट द्या.