भारताच्या 58 व्या प्रजासत्ताक दिनी लष्करातील सर्वोच्च सन्मान असलेल्या अशोक चक्र पुरस्काराने सैनिकांना सन्मानित करण्यात येते. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी मूळचे केरळमधील असलेल्या कॅप्टन हर्षन यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कुपवाड्यात अतिरेक्यांशी झुंज घेता घेता कॅप्टन हर्षन यांनी जखमी अवस्थेतही आपल्या तुकडीचे नेतृत्व करत तीन अतिरेक्यांनी यमसदनी धाडले होते. अतिरेक्यांना ठार केल्यानंतरच भारतमातेच्या या पुत्राने प्राण सोडले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते कॅप्टन हर्षनच्या माता-पित्यांना गौरविले जाणार आहे. या पुरस्काराने कॅप्टन हर्षन यांचे नाव डेहराडूनच्या लष्करी अकादमीच्या 'बलिदान मंदिरात सोनेरी अक्षरात लिहिले जाईल. हा पुरस्कार समारंभाला उपस्थित रहाण्यासाठी केरळहून स्व. हर्षन यांचे वडील राधाकृष्णन नायर आणि आई चित्रांबिका नवी दिल्लीला गेले आहेत. हर्षन लहानपणापासूनच आपल्या वयाच्या मित्रांपेक्षा वेगळा होता. उत्साही वृत्ती आणि काही वेगळे करून दाखविण्याची इच्छाशक्ती त्याच्यात होती. शिवाय नेतृत्वक्षमता हा वेगळा गुण त्याच्यात होता. कॅप्टन हर्षनविषयी बोलताना आई चित्रांबिकाला किती सांगू किती नको असं होतं. पण शब्दांच्या प्रवाहात अश्रू कधी येऊन मिसळतात हे त्यांनाही कळत नाही. पुत्र गमावल्यानंतरही ही माता म्हणाते, ‘’डेहराडूनच्या बलिदान मंदिरात मातृभूमीची रक्षण करताना शहीद होणार्याची नावे लिहीली जातात. शहीद होणार्या प्रत्येक आईसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.’’ असा पुत्र जन्माला घालणारी आई आणि तो पुत्रही धन्य होत. कॅप्टन हर्षनचे वडील राधाकृष्णन सांगतात, की हर्षनला लहानपणापासूनच सैनिक बनून देशाचे संरक्षण करण्याची इच्छा होती. तो अभ्यासात हुशार होताच पण खेळण्यातही सर्वांपेक्षा पुढेच असायचा. बारावीत त्याला सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळाला होता. हर्षनने सैन्यात प्रवेश मिळावा यासाठी आई-वडिलांना न सांगताच एनडीएची परीक्षा दिली. त्याला प्रवेशही मिळाला. एनडीएची परीक्षा पूर्ण केल्यानंतर त्याला डेहराड़ूनच्या भारतीय सैन्य अकादमीत प्रवेश मिळाला. 2002 मध्ये काश्मीरमध्ये त्याने प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सैन्याची सेवा बजावत असतानाच 7 मार्च, 2007 चा काळा दिवस उजाडला. हर्षन आणि त्याच्या 'रेड डेव्हिल्स' तुकडीने एका दहशतवाद्याला शस्त्रांसहित पकडले. या दहशतवाद्याकडून कुपवाड्यात भारत-पाक सीमेवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. कॅप्टन हर्षन आणि त्यांच्या पूर्ण टीमने दोन आठवडे शोधूनही दहशतवादी सापडले नाहीत. पण काही दिवसांतच बातमी आली. कुपवाड्यात दहशतवाद्यांनी हल्ला चढविला आहे. हर्षन 'रेड डेव्हिल्स' या आपल्या तुकडीसोबत कुपवाड्याला पोहचले. दहशतवाद्यांचा पुरेपूर बंदोबस्त त्यांच्या तुकडीने केला. त्यांचा धैर्याने सामना करत असतानाच एका दहशतवाद्याची गोळी कॅप्टन हर्षन यांना लागली. जखमी असतानादेखील स्वतःची काळजी न करता भारतमातेचा हा थोर सुपूत्र पुढे सरसावला आणि तीन दहशतवाद्यांना त्यांनी यमसदनी धाडले. दहशतवाद्यांच्या गोळीने गंभीर जखम झालेली असतानाही हर्षन आपल्या तुकडीचे कुशल नेतृत्व करीत होते. पण उंचावर लपलेल्या एका दहशतवाद्याने पुन्हा डाव साधला. त्याने वरून केलेल्या गोळीबारात कॅप्टन हर्षनच्या मानेला गोळी लागली आणि देशाच्या या थोर सुपुत्राने प्राण सोडले. कॅप्टन हर्षन शहीद झाले त्यावेळी त्यांचे वय फक्त २६ वर्षाचे होते. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी देशासाठी प्राण देणार्या कॅप्टन हर्षन यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो. जय हिंद!