रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

घरातली बेटं

घर ही कल्पना अतिश सुंदर, उत्कट. मग ते घर म्हणजे भिंती आणि वर छप्पर अशी कल्पना करत असाल तर आपल संवेदनशील मनाचं काय आणि त्या मनातील अतिसंवेदनशील भावनांचं काय? वास्तू ही बांधली जाते. अनेक साहितंचं एकत्रीकरण करून डौलदार वास्तू बांधता येते. पण घर सांधताना राहणारी मनंही प्रशस्त असालाच हवी असतात. 
 
पाठीमागे जमीन आणि अंगावर आकाश पांघरलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातील घराचं स्वप्न पाहिले तर त्या घराच्या दाराला दु:खाची तोरणे लावलेली दिसतीलच. रस्त्याने जाताना मोठमोठय़ा वास्तू मोठमोठय़ा डौलाने उभ्या असतात. या वास्तूचं ‘घर’ करताना सर्वच व्यक्तींचा  कस लागायला हवा. 
 
मोठमोठी घरं आणि त्यात राहणारी सुशिक्षित माणसं. स्वत:च्या पदव्या, पैसा, अहंकार सारंच सांभाळत घरात वावरतात, पण हरवलेल्या   बेटांसारखी. हो, घरातच प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेटच. चोहीकडून सर्व सुबत्तेने वेढलेले पण तरीही एकाकी. मोठ मोठय़ा झुंबरांनी सजलेल आणि प्रकाशमान झालेल्या दिवाणखानत उदास, अंधारलेले प्रवासी वावरताना दिसतात. तेव्हा त्या घराचं हरवलेपण लक्षात येत जातं. मोठमोठय़ा खिडक्या आणि भरगच्च येणारा वारा पण घरात मोकळा श्वासही न घेऊ शकणार्‍या व्यक्तीची घुसमट पाहिली की जीव कासावीस व्हायला लागतो. 
 
बाहेरच्या जगातून घराकडे येणारी पावलं जर बाहेरच रेंगाळाला लागत असतील आणि अडखळत असतील तर ते त्या घराचं सर्वात मोठं अपयश ठरतं. घराबद्दलची ओढ कमी होत असली तर समजावं की घरातल्या माणसांमध्ये किती मोठी दरी पडायला लागली आहे. आणि अशातच वाटायला लागतं की खरंच एकाच छताखाली कितीतरी अनोळखी लोक फक्त नात्यांचे साखळदंड जपत राहात आहेत. कुठे गेलं ते घर, जिथे डोळे उघडताच नाकाला उदबत्तीचा सुगंध येऊन भेटायचा. कानावर वडिलांचे अथर्वशीर्षाचे बोल पडायचे. अंघोळ झाल्यावर चिमुकले हात देवासमोर जोडले जायचे. कितीही मुलांचा आपसात गोंधळ चाललेला असला तरी ‘काय चाललयं रे?’ असा जरब असलेला आवाज आला की तोंडावर हात ठेवून सारेच गप्प बसायचे. त्या आवाजाची भीती नव्हती पण आदर होता. आणि सारं घर एका छताखाली प्रेमाने नांदतं हे जाणवायचं. 
 
दारातल्या तुळशीपासून तर गोठय़ातल्या वासरापर्यंत सारेच प्रेमाचे असायचे. घरच्या लेकी म्हणून आत्यांचे किती कोडकौतुक केले जायचे. काका, काकू, आजी सारेच रागवायचे हक्काने पण कधी तुझा- माझा म्हणून मुलांची वाटणी झाली नव्हती. सणवार तर उत्साहात, आनंदात कधी संपले ते कळायचे देखील नाही. भरभरून जगलेली ही माणसं एकाएकी बदलली कशी? घरांनीही कात टाकली. ‘जुनं काही नको सरळ वृद्धाश्रम गाठा’ एवढी टोकाची भूमिका घेतली कशी? माहीत नाही. 
 
आज घरं खूप सौंदर्यंवान झालीत. पण माणसांना टाळू लागलीत. घरात सारेच ‘ऑनलाइन’ आहेत पण एकमेकांशी ऑफलाइनच आहेत. पण व्यक्तीस्वातंत्रच्या प्रगल्भ कल्पना स्पष्ट झालेली ही माणसे दिवसेंदिवस एकाकीच होणार. आणि एकाच घरात अनोळखी अनेक घरातलीच बेटं दिसणार हे नक्की. असं सारखंच वाटायला लागतं..
 
स्वाती कराळे