सकाळची धावपळीची वेळ. घरातील कामं आटोपून, ऑफिसला जाताना मुलाला शाळेत सोडायचे, मग हे काम करायचं आहे, मग ते काम आहे अशी डोक्यात चक्रं चालू आणि कविता घराबाहेर पाऊल टाकणार, एवढ्यात आतून सासऱ्यांची हाक आली - सूनबाई, जरा तेवढा चष्मा स्वच्छ करून दे ग.
कविता चरफडतच परत फिरली, चष्मा साफ करून दिला, पण जे व्हायचं तेच झालं - मुलाला शाळेत आणि तिला ऑफिसमध्ये लेट मार्क मिळाला.
घरातून बाहेर निघताना सासऱ्यांचं हे असं टोकणं कविताला आवडत नव्हतं. एकीकडे तिला हे सुध्दा जाणवत होतं की पलंगावरून खालीसुद्धा उतरू न शकणारे तिचे सासरे, सारखे काही तिला वेठीला धरत नव्हते. संपूर्ण दिवसातून तिला हक्काने ते अशीच एक दोन छोटी मोठी कामं सांगत, काही जाच किंवा सासुरवास करत नसत. कामं छोटी असायची, पण ऑफिसला उशीर व्हायचा तो व्हायचाच ना.
नवऱ्याशी बोलून तिनं यावर तोडगा काढला, रोज पाच मिनिटं लवकर उठून, सासऱ्यांनी सांगायच्याआधीच ती त्यांचा चष्मा पुसून, स्वच्छ करून ठेवू लागली. पण काही ना काही तरी कारण काढून कामावर जाणाऱ्या सुनेला सासऱ्यांनी काहीतरी छोटंसं का होईना काम सांगणं काही बंद होईना. पुढं पुढं तर असं होत गेलं की शेवटी कंटाळून कविताने सासऱ्यांच्या हाकेला ओ देणंच बंद करून टाकलं.
त्यानंतर एका सुट्टीच्या दिवशी सासरेबुवा रूटीन चेक अपसाठी डॉक्टरांकडे गेले होते. कविता घरीच होती, तिनं विचार केला - अनायसे आज सुट्टी आहे, वेळ आहे आणि सासरे नाहीयेत तेवढ्यात त्यांची खोली स्वच्छ करून घेऊ, पसारा आवरू, साफसफाई करून घेऊ.
पलंगाखाली सासऱ्यांची डायरी पडलेली दिसली. सासरेबुवा दिवसभर काही ना काही तरी लिहीत बसलेले असायचे, काय लिहितात ते बघू तरी म्हणून कुतूहलाने तिने डायरी चाळली. आणि एका पानाशी थबकली, लिहिलं होतं ...
सूनबाई, अग, हल्लीच्या या धकाधकीच्या आयुष्यात घरातून बाहेर पडताना तुम्ही मंडळी आम्हा म्हाताऱ्यांचे आशिर्वाद घ्यायला विसरता. म्हणून मग काहीतरी बहाणा काढून तुला बोलावतो झालं. तू खोलीत आलीस की मनातल्या मनात तुझ्या डोक्यावर माझा म्हाताऱ्याचा मायेचा हात ठेवतो आणि ' शुभं भवतु ' म्हणतो. तसे आमचे अदृश्य आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतातच, पण तरीही ...
कविताचे डोळे भरून आले. त्यांची डायरी वाचल्याचं तिनं सासऱ्यांना सांगितलं नाही, पण दुसऱ्या दिवसापासून सासरा - सून नातं जाऊन बाप लेकीचे नाते सुरू झाले होते.
आता ती सगळी कामं आटोपून पाच मिनिटं आधीच सासऱ्यांच्या खोलीत जायची, त्यांचा चष्मा पुसून ठेवायची, टेबलावर च्या तांब्यात पाणी भरून ठेवायची आणि ही कामं चालू असताना सासऱ्यांशी गप्पा मारायची, वेळप्रसंगी लटके रागेही भरायची. आणि मग शाळेची वेळ झाली की मुलाला आजोबांच्या खोलीत बोलावून त्यांना टाटा करायला सांगायची.
जेवणखाण तेच होतं, औषधंही तीच होती पण सासऱ्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली, चेहरा आनंदी दिसू लागला.
पण शेवटी म्हातारं हाड, एके दिवशी रात्री झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि सासऱ्यांचे दुःखद निधन झाले. अंत्यदर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाने हटकून मृत्यूनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या स्मितहास्याबद्दल लेकाचे व सुनेचे कौतुक केले होते.
सासऱ्यांच्या निधनाला दोन वर्षे होऊन गेली होती. पण आजही कविता रोज ऑफिसला जायच्याआधी त्यांच्या खोलीजवळ क्षणभर थबकते, वाटतं, आजही सासरे हाक मारतील आणि म्हणतील - बेटा, जरा चष्मा पुसून दे...
- सोशल मीडिया