शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (09:47 IST)

व्हिलचेअर

विवियाना मॉल मध्ये रविवारी संध्याकाळची वेळ म्हणजे तरुणांची गर्दीची वेळ.. त्यांचा चिवचिवाट, भरलेले कॉफी हाऊसेस, सेल्फी टाईम.
 
अशा गर्दीच्या वातावरणात चटकन नजर गेली ती एका व्हीलचेअर वर एका आजीबाईंना प्रेमाने नेणारा एक माणूस आणि सोबत 12-13 वर्षाचा एक मुलगा.. मी आणि माझी मैत्रीण तिथे एका बाजूला बाकावर बसलो होतो. आम्ही बघत होतो.. व्हीलचेअर ढकलत तो माणूस त्या आजीबाईंना इकडून तिकडे नेत होता आणि त्याचा मुलगा ही त्याच्या सोबत होता..
 
 5 मिनिटांतच तो माणूस त्या आजींची व्हीलचेअर आमच्या अगदी बाजूला आणून उभं करून त्या मुलाशी इंग्रजीत बोलत होता. "मी ATM मधून पैसे काढून 1, 2 कामे करून येतो, तू आजी जवळ थांब" असं सांगून निघून गेला.
 
त्या आजी आमच्याकडे थोडं बघून हसल्या.. दोन - तीन मिनिटं गेली आणि हिंदीत मला सांगू लागल्या.. "हा माझा नातू. मुलाचा मुलगा, आणि तो गेला नां पैसे काढायला तो माझा मुलगा.. आम्ही ठाण्यातच राहतो.. आज 'सुईधागा' सिनेमा बघायला आम्ही आलो. सुनेला तिच्या कॉलेज ग्रुप बरोबर बाहेर जायचं होतं, मग माझ्या मुलांनी आमचा हा बेत जुळवून आणला.."
 
नकळत माझ्या तोंडून "अरे वाह!"  निघून गेलं..
 
आजी पुढे सांगू लागल्या... माझं वय 73 आहे.. मला चालता येत नाही म्हणून ही खुर्ची आणि ही फोल्डिंग काठी.. सिनेमा, नाटक बघायला जायचं तर थिएटर मध्ये काळोख व्हायच्या आत आम्हाला आत शिरावं लागतं. म्हणून मी कुठे जायचं म्हणजे माझी वरातच असते.. पण मुलगा, सून ऐकत नाहीत..
 
अजून दोन मुलं आहेत मला.. पण ते मला सांभाळायला तयार नाहीत.. हा मुलगा सायकॉलॉजिचा प्राध्यापक आहे. तो मला आनंदाने सांभाळतो.. दुसरी भावंडे सांभाळत नाहीत, त्या बद्दल त्याचा आकस नाही. मला माझा मुलगा थिएटर मध्ये काळोख व्हायच्या आतच घेऊन येतो.
 
आज आम्ही बाहेर जेवून सिनेमाला गेलो.. आता मॉल मध्ये या खुर्चीतून मला फिरवतो.. मी नको म्हणत असताना त्याचं म्हणणं.. 'बघ नं जग किती बदललंय. सुंदर गोष्टीही आहेतच. असं फिरलीस, चार माणसं बघितलीस की तुझं मन व शरीर ही फ्रेश होईल. मी मनाचा अभ्यास केलेला माणूस आहे म्हणूनच सांगतोय.'"
 
हे सांगत असताना त्यांचा मुलगा काम आटपून परत आला.. आजीबाई माझ्याशी बोलत असलेल्या बघून त्यांनी त्यांना हिंदीत मला निर्देश करून विचारलं, "कौन है? किससे बात कर रही हो मम्मा..?"
 
आजीबाईंनी लगेच सांगितलं, "यहिपे बैठी थी। ऐसे ही मैने बात की उससे।"
 
मला वाटलं, हा माणूस वैतागेल. कोण कुठली ही बाई ! पण त्यांनी चक्क हसून मला जे सांगितलं त्यावर मी थक्क झाले.
 
ते म्हणाले, "आम्ही आईला दर महिन्याला एकदा असं बाहेर फिरवून आणतो.. रोज आम्ही व्यस्त असतो. मग एक दिवस तिला असं बाहेर घेऊन येतो. माझे वडील असतांनाही आम्ही हेच करायचो. ते नाहीत आता.. आज माझी बायको नाही येऊ शकली, नाहीतर आम्ही तिघे येतो. एक दिवस तिला देतो. कधी सिनेमा, नाटक, ते नाही जमलं तर संध्याकाळी तरी काहीतरी प्लॅन करतो आणि तिला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यामुळे तिची तब्बेत चांगली राहायला मदतच होते ना."
 
आम्हाला त्यांनी धन्यवाद म्हटलं, "माझ्या आईला तुमची सोबतच झाली" म्हणून ते तिघेही निघून गेले नि मी आणि माझी मैत्रीण सुन्न झालो. अरे किती नशीबवान या आजी..
 
 कुठे ही परिस्थिती नी कुठे 'आईवडील नकोत' ही भावना जोपासणारी काही मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात..  समाजात एकाच परिस्थिती बाबत दोन भिन्न बाजू दिसल्या.
 
वय झालं आहे.. चालता येत नाही.. गर्दीत कुठे न्यायचं.. असा विचार न करता हा आजींचा मुलगा, सून आणि नातू ही यांच्या लेखी 'आई म्हातारी झाली पण मी नेईन, तिला आनंद मिळावा' ही भावना..
 
अशी ही माणसं समाजात आहेत हे बघून आम्हां दोघींना खरंच खूप बरं वाटलं. आणि किती तरी वेळ आम्ही शांत पणे त्या तिघांच्या पाठमोर्‍या आकृती कडे शांतपणे बघत होतो आणि डोळे कधी पाणावले कळलंच नाही...
 
- सोशल मीडिया