गणेशोत्सवात प्रसादासाठी किंवा उपवासासाठी उत्तम पर्याय ''मावा मखाना खीर''
मावा मखाना खीर ही उपवासासाठी किंवा गणेशोत्सवात प्रसादासाठी बनवली जाणारी अत्यंत पौष्टिक, क्रीमी आणि चवदार खीर आहे. चला तर रेसिपी जाणून घ्या.....
साहित्य-
मखाना : २ कप
दूध: १ लिटर (फुल क्रीम)
मावा / खवा: १/२ कप (किसलेला)
साखर: १/२ कप (आवडीनुसार)
साजूक तूप: २ चमचे
काजू, बदाम आणि पिस्ता: २-३ चमचे (चिरलेले)
केशर: ८-१० काड्या (२ चमचे कोमट दुधात भिजवलेल्या)
वेलची पूड: १/२ चमचा
कृती-
१. मखाने भाजणे: कढईत १ चमचा तूप गरम करा. त्यात २ कप मखाने मंद आचेवर ४-५ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजा. भाजलेले मखाने थंड झाल्यावर त्यातील अर्धे मखाने मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्या आणि उरलेले अर्धे मखाने अखंड ठेवा.
२. सुका मेवा भाजणे: उरलेल्या १ चमच्या तुपात चिरलेला काजू, बदाम आणि पिस्ता हलके सोनेरी होईपर्यंत तळून बाजूला काढा.
३. दूध उकळणे: एका मोठ्या भांड्यात १ लिटर दूध उकळायला ठेवा. दूध उकळल्यावर आच मंद करा आणि दूध थोडे घट्ट होईपर्यंत (सुमारे ७-८ मिनिटे) उकळू द्या.
४. मावा आणि मखाना घालणे: दुधात किसलेला मावा घाला आणि तो दुधात पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा. त्यानंतर अखंड मखाने आणि दळलेली मखान्याची पावडर दुधात मिक्स करा.
५. खीर शिजवणे: मंद आचेवर खीर ५ ते ७ मिनिटे शिजवून घ्या, जेणेकरून मखाने मऊ होतील आणि खीर घट्ट-क्रीमी बनेल.
६. साखर आणि सुका मेवा घालणे: आता यात साखर, भिजवलेले केशर, तळलेला सुका मेवा आणि वेलची पूड घाला. साखर विरघळेपर्यंत २ मिनिटे आणखी उकळा. गरमागरम किंवा फ्रिजमध्ये थंड करून मावा मखाना खीर सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik

