मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By वेबदुनिया|

पहिली भारतीय महिला डॉक्टर

ND
पुणे शहरात जन्मलेल्या आनंदीबाई जोशी यांना भारतातील पहिली डॉक्टर असे संबोधले जाते. ज्या काळात महिलांनी शिक्षण घेणेही अशक्यप्राय गोष्ट मानली जायची त्या काळात विदेशात जाऊन त्यांनी डॉक्टरी डिग्री मिळविणे हे खरंच गौरवास्पदच आहे. त्यांचा विवाह बालवयातच म्हणजे त्या नऊ वर्षांच्या असताना वीस वर्षांनी मोठ्या असणार्‍या गोपाळरावांशी झाला होता. निव्वळ चौदा वर्ष वय असताना आई बनणार्‍या आनंदीबाईंना केवळ दहा दिवसातच आपल्या बाळाचा मृत्यू पाहिल्याने फार मोठा धक्का बसला.

आपले मूल गमावल्यानंतर त्यांनी डॉक्टर बनून अशाप्रकारे अकाली होणारे मृत्यू थांबविण्याचा प्रयत्न करायचा असा पण केला. या कार्यात त्यांना पती गोपाळरावांचे साहाय्य मिळाले. ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनीच आनंदीबाईंना प्रोत्साहन दिले. आनंदीबाई जोशींचे व्यक्तित्व महिलांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांनी इ.स. 1886 मध्ये आपले डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार केले. एका विवाहित स्त्रीने विदेशात जाऊन शिक्षण घ्यावे याबद्दल टीकाकारांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले. पण आनंदीबाई दृढनिश्चयी होत्या. टीकाकारांची पर्वा न करता त्यांनी पहिली महिला डॉक्टर होण्याचा गौरव प्राप्त केला.

डिग्री मिळविल्यानंतर आनंदीबाई भारतात परतल्या. मात्र त्यांचे आरोग्य खालावयास सुरुवात झाली. आणि अल्पवयातच त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. आनंदीबाईंनी ज्या उद्देशाने डॉक्टरी डिग्री मिळविली होती त्यात त्या यशस्वी झाल्या नाहीत हे जरी खरे असले तरी त्यांनी समाजात जे स्थान मिळविले ते आजही गौरवास्पद आहे.