सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जून 2022 (08:23 IST)

राणा दाम्पत्यावर आरोपपत्र दाखल, पुढील सुनावणी १६ जूनला

हनुमान चालिसा पठण वादावरून चर्चेत आलेले खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार आहे. दोघांनाही आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, न्यायालयाने त्यांना वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली आहे. पोलिसांनी भादंवि कलम ३५३ अन्वये दाखल केलेल्या गुन्ह्यात राणा दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
 
नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याविरुद्ध देशद्रोह आणि इतर कलमांखाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. राणा दाम्पत्याला ४ मे रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि ५ मे रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
 
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बोलावले
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या छळप्रकरणी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने महाराष्ट्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तांना १५ जून रोजी समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खासदार राणा यांनी मुंबईत अटक आणि तुरुंगात असताना केलेल्या छळाची तक्रार विशेषाधिकार समितीकडे केली होती.