वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने सपासप वार करुन हत्या, भरदिवसा घडलेल्या प्रकारने वाशिममध्ये खळबळ
वाशिम जिल्ह्यात दिवसाढवळ्या एका वृद्ध रखवालदार दाम्पत्याचा कुऱ्हाडीने सपासप वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील चाकातीर्थ प्रकल्प परिसरात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी भर दुपारी घरात घुसून कुऱ्हाडीने वार करुन खून केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाशिम जिल्ह्याच्या डव्हा इथं ही घटना घडली आहे.गजानन निंबाळकर-देशमुख (वय-60) आणि निर्मला निंबाळकर-देशमुख (वय-55) अशी निर्घृण खून करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नावं आहे.
निंबाळकर दाम्पत्य हे गेल्या अनेक वर्षापासून चाकातीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते.आज दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी ते राहत असलेल्या घरात शिरले आणि त्यांनी भीषण हल्ला चढवला. हल्लेखोरांनी गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी घराचा दरवाजा उघडा असल्याने स्थानिक त्यांची चौकशी करण्यासाठी गेले त्यावेळी दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठून दिले.