मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2022 (20:40 IST)

बाप्परे, मुंबईतील तब्बल 92 हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा बंद

मुंबईतील तब्बल 92 हॉटेल रेस्टॉरंटमध्ये आणि 40 व्यावसायिक इमारतींमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा बंद असल्याची माहिती समोर आली  आहे. अग्नी सुरक्षा बंद असल्याने मुंबई अग्निशमन दलाने या हॉटेल आणि इमारतींना नोटीस पाठवली आहे. याशिवाय, पुढील 120 दिवसांत अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अग्निशमन दलाने संपूर्ण मुंबईत एकाच वेळी अचानक तपासणी मोहीम सुरु केल्याचे समजते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील सर्व भागातील हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अचानक पाहाणी केली. या पाहणीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तपासणीनंतर अग्निशमन दलाने मुंबईतील 92 हॉटेल्स आणि 40 व्यावसायिक इमारतींना नोटीस पाठवली आहे.
 
कोणत्याही हॉटेल रेस्टॉरंट अथवा व्यावसायिक इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे संबंधित मालक आणि सोसायटी धारकांना बंधनकारक आहे. त्यानुसार ही अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित केली की नाही, हे तपासणी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने अचानक पाहाणी केली.
 
त्यानुसार, मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील 440 हॉटेल, रेस्टॉरंटमधील अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे की, नाही याची 3 आणि 4 डिसेंबर रोजी तपासणी केली. या तपासणीत तब्बल 92 हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर 92 हॉटेल रेस्टॉरंट मालकांना नोटीस बजावण्यात आली.

Edited by-Ratnadeep Ranshoor