शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (21:57 IST)

मुंबई पोलीस भरतीसाठी सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर

मुंबई पोलीस शिपाई भरती-२०१९ मध्ये आरक्षण नियमाला बगल देत ‘कट ऑफ’ जाहीर करण्यात आला होता. तो रद्द करत थोड्याच दिवसात सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर केला आहे. सुधारित ‘कट ऑफ’नुसार ज्या उमेदवारांना शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले नसल्यास अशा उमेदवारांनी ६ ते ८ डिसेंबरदरम्यान लेखी निवेदन सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे . यामुळे आरक्षित वर्गातील अनेक उमेदवारांना संधी मिळणार आहे.
मुंबई पोलीस शिपाई भरतीकरिता १४ नोव्हेंबरला अकराशे जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर उत्तरतालिकेवरील हरकतींचे समाधान करून २६ नोव्हेंबरला सदर लेखी परीक्षेची सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय १:१० प्रमाणातील पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याचे पोलीस विभागाने त्यांच्या पत्रात सांगितले आहे.
मात्र, या यादीत खुल्या प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ (७७) हा आरक्षित प्रवर्गापेक्षा कमी होता. त्यामुळे या भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणाच्या नियमाला बगल देण्यात आल्याने आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांचे नुकसान होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे या ‘कट ऑफ’प्रमाणे एखाद्या उमेदवाराला बोलवण्यात आले नसल्यास त्याने ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत पोलीस मुख्यालय, संकुल हॉलच्या बाजूला, नायगाव, दादर पूर्व, मुंबई येथे भेटून लेखी निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.