गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (23:24 IST)

मुंबई महानगरपालिकेत भंगार घोटाळा

मुंबई महानगरपालिकेत विविध विभागामध्ये जुने निरुपयोगी भंगार सामानाचा लिलाव करण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा काढल्या जातात. या भंगार सामानाच्या निविदांसाठी भंगार सामानाच्या डीलर्सचं एक मोठे रॅकेट महापालिकेत गेली 50 वर्ष कार्यरत असल्याचा गंभीर आरोप भाजपनं  केला आहे.
 
या रॅकेटमधील डीलर्सपैकी काही डीलर्स कंपनी एकाच मालकाच्या आहेत. आणि काही कंपन्या एकाच पत्त्यावर आहे. या सर्व रॅकेटमुळे महापालिकेचं दरवर्षी करोडो रुपयांचं नुकसान होत असल्याचा भाजपचा आरोप आहे. हे रॅकेट नवीन निविदाकाराला आतमध्ये शिरूच देत नाहीत. भंगाराच्या निविदांत स्पर्धाच होऊ देत नाहीत. इतकंच नव्हे तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून कोट्यवधीची लुट करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचे पडसाद स्थायी समितीत उमटल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहेत. 
 
1) A.A. Auctioners & Contractors Pvt. Ltd. ही कंपनी महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या जुन्या भंगार गाड्यांचा लिलाव करते. या कंपनीचे संचालक (मालक) अब्दुल हसन अली खान आणि इमरान अब्दुल हसन अली खान असून त्यांचा नोंदणीकृत पत्ता शॉप नं. 20, महापालिका शाळे समोर, लिंक रोड, कोहिनूर सोसायटी, साकीनाका, मुंबई 400 072  असा आहे.
 
2) महापालिकेच्या जुन्या भंगार गाड्यांच्या लिलावात सहभागी होणारे दोन मोठे डीलर्स मेसर्स गरीब नवाज कॉर्पोरेशन व मेसर्स अख्तर इंटरप्रायजेस आहेत.
 
3) महापालिकेच्या लिलावात सहभागी होणारा एक डीलर कंपनी मेसर्स गरीब नवाज कॉर्पोरेशन यांचाही पत्ता शॉप नं. 20, महापालिका शाळे समोर, लिंक रोड, कोहिनूर सोसायटी, साकीनाका, मुंबई 400 072 असा आहे. या कंपनीचा मालक अब्दुल हसन अली खान हाच आहे. 
 
4) महापालिकेच्या लिलावात सहभागी होणारा आणखी एक डीलर कंपनी मेसर्स अख्तर इंटरप्रायजेस (M/s. Akhtar Enterprises) यांचाही पत्ता शॉप नं. 20/बी, महापालिका शाळे समोर, लिंक रोड, कोहिनूर सोसायटी, साकीनाका, मुंबई 400 072 असा आहे. आणि त्यांचे मालक अख्तर हसन अली खान आहेत. अब्दुल व अख्तर हे एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ आहेत. 
 
5) मेसर्स A.A. Auctioners & Contractors Pvt. Ltd. महापालिकेच्या जुन्या व भंगार गाड्यांच्या लिलावाची किंमत ठरवतात आणि लिलावाचे आयोजन करतात. आणि या लिलावात सहभागी आणि पात्र होतात गरीब नवाज कार्पोरेशन आणि मेसर्स अख्तर इंटरप्रायजेस. म्हणजेच महापालिकेच्या वतीने लिलाव करणारा आणि लिलावात सहभागी होणारा लाभार्थी या दोघांचाही पत्ता सारखाच आणि मालकही सारखेच आहेत.
   
6) मेसर्स तवाब हुसैन स्क्रॅप ट्रेडर्स, मेट्रो इंटरप्रायजेस , नशिबदार मुसाहीब अॅन्ड कंपनी या तीनही वेगवेगळ्या स्क्रॅप डीलर कंपनीचा पत्ता मात्र एकाच ठिकाणी म्हणजे गाळा क्र. 310 छत्रपती शिवाजी कुटीर मंडळ, अनिस कंपाउंड, कोहिनूर सोसायटी, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प), मुंबई – 400 070 असा आहे. आश्चर्य म्हणजे या तीनही कंपन्या आपापसात कंत्राट निविदेत स्पर्धा करतात आणि कंत्राट गिळंकृत करतात.
 
A.A. Auctioners & Contractors Pvt. Ltd. या भंगार गाडी लिलाव करण्याऱ्या कंपनीची व या लिलावात भाग घेणाऱ्या 21 कंपन्यांची दक्षता विभागातर्फे चौकशी करून, लेखा परीक्षण विभागातर्फे लेखा परीक्षण करून आवश्यकता वाटल्यास महापालिकेचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावं आणि त्यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी खटला भरावा अशी मागणी भाजपनं केली आहे.