बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (08:27 IST)

तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक वाचले, मोठी जीवितहानी टळली

मुंबईतील कल्याण डोंबिवलीमधील कोपर भागात एका तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक दुर्घटनेआधीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. कुणाल मोहिते (वय १८) याला रात्री उशिरापर्यत जागून वेब सिरिज बघण्याची सवय आहे. याच सवयीमुळे जागा असणाऱ्या कुणालला दुर्घटनेचा अंदाज आल्याने त्याने इमारतीमधील लोकांना वेळीच सावध केले. इमारतीतील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यानंतर इमारत कोसळली.
 
कुणाल हा नेहमी वेब सिरीज पाहात २ वाजेपर्यंत झोपतो पण, त्या दिवशी झोप लागत नसल्यामुळे पहाटे ४ वाजेपर्यंत वेब सिरिज बघत बसला होता. दरम्यान त्याला त्याच्या किचनमधील काही भाग ढासळत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्याने घरातल्यांना जागे करत घडणाऱ्या गोष्टीची कल्पना दिली. त्याने संपूर्ण इमारतीमधील सर्व लोकांना जागे करुन इमारत कोसळत असल्याची माहिती दिली. वेळीच सावध झाल्याने इमारतीमधील तब्बल ७५ लोक इमारतीमधून सुरक्षितरीत्या बाहेर पडले.