गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 10 जानेवारी 2022 (15:45 IST)

मुंबईत थंडीच्या हंगामातील सर्वात कमी तापमानची नोंद

उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 
 
मुंबईत यंदा थंडीच्या हंगामातील सर्वात कमी तापमानची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत १३.२ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत.
 
स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ परिसरात १३.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात मुंबईतील पारा हा ५ अंशांनी घसरला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
 
विशेष म्हणजे मुंबईतील कमाल तापमानातही घसरण झाली आहे. सध्या मुंबईत २६.७ कमाल तापमान पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे तापमानही सर्वात कमी आहे. दरम्यान पुढील ३ ते ४ दिवस मुंबईत ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
पुढील किमान आठवडाभर तरी मुंबई आणि उर्वरित राज्यात थंडीची तीव्रता कायम असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईच्या हवेत वाढलेला सुखद गारव्याचा नागरिक आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.