गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

केरळ: ‘ई’ सिगारेटवर बंदी

तिरुवनंतपुरम्- आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरणार्‍या ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’वर बंदी आणण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. ‘ई’ सिगारेट ओढल्याने अनेक आजार होतात, हे विविध अध्ययन आणि संशोधनानंतर सिद्ध झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. ई-सिगरेटमुळे कर्करोग आणि हृदयरोग होतो, असा निष्कर्ष या संदर्भात अभ्यास करणार्‍या आरोग्यविषयक संस्थांनी काढला आहे, हे विशेष. 
 
केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी गुरुवारी अतिरिक्त मुख्य सचिवांना (आरोग्य) आदेश देऊन इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे उत्पादन, विक्री आणि जाहिरातीवर तत्काळ बंदी आणण्यास सांगितले. 
 
बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार्‍या ई सिगरेटमुळे लहान मुलांच्या आणि तरुणांच्या आरोग्यावर व भवितव्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहे, याकडे केरळमधील माध्यमांनी सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच धूम्रपानाच्या माध्यमातून गांजा, हशीश व अन्य मादक द्रव्य सेवनाचे प्रमाण वाढल्याचे राज्याच्या औषध नियंत्रण विभागाला आढळून आले होते. याची गांभीर्याने दखल घेऊन केरळ सरकारने ‘ई’ सिगरेटवर तत्काळ प्रभावाने बंदी आणण्याचा आदेश जारी केला आहे. ई-सिगरेट हाताळायला सहज असून याच्या माध्यमातून बाष्पीकृत निकोटीन ओढता येते.