1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (22:01 IST)

खळबळजनक! फाल्गुनी पाठक दांडियापाठोपाठ आता किंजल दवेच्या दांडियातही फसवणूक; चौघांना अटक

नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला असून त्यानिमित्तानं गरबाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते.  याच निम्मिताने  प्रसिद्ध सेलिब्रेटी  'दांडिया क्वीन' फाल्गुनी पाठकच्या दांडिया प्रोग्रामपाठोपाठ आता किंजल दवेच्या दांडिया प्रोग्राममध्ये देखील फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याची घटना समोर आली आहे. या दांडिया प्रोग्रामसाठी बनावट पासेसच्या विक्री प्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. एमएचबी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
आमदार सुनील राणे यांनी 'रंगरात्री दांडिया नाईट्स'चं आयोजन केले आहे. या दांडियासाठी बनावट पासेसची विक्री करण्यात आल्याचे समोर येताच पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी ३६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. करण शाह, दर्शन गोहिल, परेश नेवरेकर आणि कविष पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
'फर्झी' नावाची वेब सिरीज पाहून प्रोत्साहित होऊन आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून १००० बनावट पासेस, १००० होलोग्राम स्टिकर, लॅपटॉप आणि प्रिंटर जप्त केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत.
 
दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या दांडिया प्रोग्राममध्ये फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती. फाल्गुनीच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून तब्बल १५६ तरूणांची फसवणूक करण्यात आली आहे. या तरूणांना सव्वापाच लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. स्वस्तामध्ये पासेस देण्याचे तरूणांना आमिष दाखवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं.
 
बोरिवलीमध्ये राहणाऱ्या विशाल शाह या तरूणाने आपण फाल्गुनी पाठकच्या प्रोग्रामचा अधिकृत विक्रेता असल्याचे सांगितले. फाल्गुनीच्या दांडिया प्रोग्रामचा पास ४,५०० रुपयांऐवजी ३,३०० रुपयांना मिळणार असल्याचे या तरुणांना सांगण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदारासह १५६ जण पास खरेदी करण्यास तयार झाले. ठरल्यानुसार सर्वांनी रक्कम देऊ केली. मात्र त्यानंतर विशाल शाहने मोबाईल बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली होती. या दोन्ही घटनानंतर आता या कार्यक्रमाच्या दरम्यान तरुणांची फसवणूक झाल्यानं चर्चेला उधाण आले आहे.