चंपई सोरेनः झारखंडचे नवे मुख्यमंत्री होत असलेले 'साधी राहणी'वाले नेते
पायात साधं चप्पल, ढगळा शर्ट आणि पँट, डोक्यावर पांढुरके केस... हीच चंपई सोरेन यांची ओळख आहे. याच साधेपणासह त्यांनी आयुष्य काढलं आहे. कोणी एखादी अडचण सोशल मीडियात त्यांना टॅग करुन मांडली की तात्काळ त्या समस्येवर समाधान काढायचं ही त्यांची कामाची पद्धत आहे. चंपई हे सगळं करतात. आता ते झारखंडचे मुख्यमंत्री होत आहेत. झारखंडच्या सत्ताधारी आघाडीच्या आमदारांनी त्यांना नेतेपदी निवडलं आहे.
अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन आपलं पद सोडतील अशी चिन्हं दिसत होती. तसेच त्यांच्या जागी त्यांची पत्नी कल्पना मुख्यमंत्री होईल असं माध्यमांत बोललं जात होतं. मात्र बुधवार 31 जानेवारी रोजी अचानक चंपई यांचं नाव समोर आलं. बुधवारी रात्री झारखंडची राजधानी रांचीमध्ये राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतल्यावर काँग्रेसचे नेते आलमगीर आलम म्हणाले, "हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, आम्ही आघाडीचे नेते म्हणून चंपई सोरेन यांची निवड केली आहे. 43 आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र आम्ही दिलं आहे. आमच्याकडे 47 आमदाराचं पाठबळ आहे. राज्यपालांनी आता (नवे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या) शपथविधीसाठी वेळ दिलेला नाही. आधी कागदपत्र पाहू आणि मग वेळ देऊ असं त्यांनी सांगितलं आहे."
चंपई सोरेन कोण आहेत?
झारखंड मुक्ती मोर्चाचे हे 67 वर्षीय नेते पक्षाध्यक्ष शिबू सोरेन आणि त्यांचे पुत्र हेमंत या दोघांचेही विश्वासू आहे.
हेमंत यांच्या मंत्रिमंडळात ते परिवहन आणि अन्नपुरवठा खात्याचे मंत्री होते. झारखंड राज्यनिर्मिती आंदोलनात ते शिबू सोरेन यांचे निकटचे सहकारी होते. ते सरायकेला मतदारसंघाचे आमदार आहेत. ते या मतदारसंघातून सातवेळा आमदार झाले आहेत. ते सरायकेला खरसांवा जिल्ह्यातील गम्हरिया भागातील जिलिंगगोडा गावचे आहेत त्यांचे वडील सेमल सोरेन शेतकरी होते. त्यांचं 2020 साली वयाच्या 101 व्या वर्षी निधन झालं. चंपई सोरेन त्यांच्या आईवडिलांच्या 6 अपत्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे अपत्य आहेत. त्यांची आई माधो सोरेन गृहिणी होत्या. चंपई यांचा लहान वयातच मानको सोरेन यांच्याशी विवाह झाला. या दाम्पत्याला सात अपत्यं आहेत.
1991मध्ये पहिला विजय
1991 साली सरायकेलामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना पहिल्यांदा विजय मिळाला आणि तत्कालीन बिहार विधानसभेचे ते सदस्य झाले. कृष्णा मार्डी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. 1995 सालीही ते निवडणूक जिंकले मात्र 2000 साली ते पराभूत झाले. 2005 च्या विजयानंतर ते कधीच पराभूत झाले नाहीत. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1956 रोजी झाला होता. त्यांचं दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे.
हेमंत सोरेन यांनी राजीनामा का दिला?
हेमंत सोरेन यांची बुधवारी ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. एका जमिनीच्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी होत आहे. ईडी अधिकाऱ्यांनी हेमंत यांना पत्र पाठवून त्यांची वेळ मागितली होती. हेमंत यांनी या अधिकाऱ्यांना 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता आपल्या निवासस्थानी बोलावलं होतं. या प्रकरणी ईडीने 20 जानेवारी रोजीही चौकशी केली होती मात्र तेव्हा चौकशी पूर्ण झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 29 जानेवारीरोजी हे अधिकारी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी गेले होते मात्र तिथं त्यांची भेट झाली नाही. तेव्हा हेमंत बेपत्ता असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होत होत्या. अर्थात दुसऱ्या दिवशी हेमंत सोरेन रांचीत सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले. तसेच आमदारांच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले.
ईडीने कथित खाणघोटाळ्यातही हेमंत यांची चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवला, हेमंत या प्रकरणांत प्राथमिक आरोपी नाहीत. ईडी केंद्र सरकारच्या हुकुमानुसार काम करतंय असा आरोप त्यांच्या पक्षाने केला आहे. आता त्यांना कायदेशीर लढाई लढायची असल्याने त्यांनी राजीनामा दिला असं सांगण्यात येत आहे.