वीटभट्टीची भिंत कोसळल्याने 4 मुलांचा मृत्यू
Haryana News: हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील बुडाना गावात एक मोठी दुर्घटना घडली असून वीटभट्टीची भिंत कोसळल्याने चार मुलांचा मृत्यू झाला आहे. मुले झोपली असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत एक मुलगी गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील अनेक मजूर कुटुंबे बुडाना येथील भट्टीवर काम करतात. तसेच भट्टीवर विटा तयार करणे, चिमणीजवळ खांब बसविण्याचे काम केले जात आहे. भट्टीच्या भिंतीजवळ लहान मुले आणि काही मजूर झोपले असताना ही भिंत त्यांच्यावर पडली. हंसीचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तसेच पाच वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर हिसार येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही पाचही मुले उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातील बाधव गावातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक मीना यांनी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याप्रकरणी पीडित कुटुंबीयांनी कोणतीही लेखी तक्रार दिलेली नाही. तक्रार आल्यास त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
Edited By- Dhanashri Naik