मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (17:21 IST)

‘व्हायब्रंट गुजरात’साठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईत रोड शो कशासाठी? संजय राऊत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीवरुन भाजपने शिवसेनेवर बोचरी टीका केली. भाजपच्या या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला आहे. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात असा सूर भाजपच्या काही नेत्यांनी आवळलाय. मात्र, आज ‘व्हायब्रंट गुजरात’साठी गुजरातचे मुख्यमंत्री अर्धे मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय, याची आठवण खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी करून दिलीय. तसेच, मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर गुजरात, असे म्हणत मुंबईच्या उद्योजकांवर गुजरात उभारत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.
मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या भेटीवरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार यांच्या पश्चिम बंगालवरील टीकेला संजय राऊत यांनी व्हायब्रंट गुजरातने उत्तर दिलंय.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. भाजपच्या आरोप-प्रत्यारोपाला काही अर्थ नाही. हा पोटशूळ आहे. विरोधकांच्या पोटात दुखू लागलं आहे. ममता बॅनर्जी आल्या. उद्योगपतींना भेटल्या. मुंबई औद्योगिक नगरी आहे. या उद्योगपतींचे देशभरात उद्योग आहेत. ते सगळीकडे उद्योग करतात. ममतांनी म्हटलं कोलकात्यातही लक्ष द्या. त्यात चुकलं काय? असा सवाल राऊत यांनी केला.
ममता बॅनर्जी या काय मुंबई लुटायला, ओरबडायला आल्या आहेत का? ममता बॅनर्जी मुंबई लुटायला आल्या असं जे म्हणत आहेत ते मूर्ख लोकं आहेत. माझा प्रश्न आहे की आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अर्ध मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरातसाठी ते मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरात तिकडे. मुंबईत काय कशासाठी? व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो करता, उद्योगपतींना आकर्षित करता ते चालतं का? यालाच मी लूट म्हणतो, असं ते म्हणाले. भाजपला आरोप करू द्या. त्यांना आरोपांचे जुलाब होत आहेत. त्यांना आरोपांचा डायरीया झाला आहे. त्यांना तोंडाचा डायरीया झाला आहे. दुर्गंधी काही काळ निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला पळवले. आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर गुजरातला गेलं तेव्हा हे लोकं का गप्प बसले? डायमंड प्रकल्पासह अनेक प्रकल्प मुंबईतून गुजरातला गेले. त्यावेळच्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल महाराष्ट्रात आल्या होत्या. मुंबईत काय ठेवलं गुजरातला चला असं त्या म्हणाल्या होत्या. ही ओरबाडण्याची भाषा आहे. ममता बॅनर्जी प्रेमाने आल्या. आम्हाला भेटल्या ही पोटदुखी आहे. योगी आदित्यनाथ इथे आले. सिने उद्योग लखनऊला नेणार म्हटले. तेव्हा का यांना मिरच्या झोंबल्या नाही? हे ढोंग बंद करा नाही तर तुमच्या ढोंगावर लोकं लाथा मारतील, असा इशारा त्यांनी दिला.