शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गुजरात विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (20:05 IST)

Gujarat Election 2022 गुजरातमध्ये आम आदमी पक्ष किती प्रभावी ? जाणून घ्या

गेल्या निवडणुकीपर्यंत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत होती. मात्र यावेळी आम आदमी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. आम आदमी पक्षानेही सुमारे 73 उमेदवारांची घोषणा केली आहे. आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी येथे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.
 
अशात गुजरातमध्ये 'आप'चा काय परिणाम होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अरविंद केजरीवाल खरोखरच काही जादू करू शकतील का? हे जाणून घ्या-

गेल्या काही महिन्यांपासून 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सिंह हे सातत्याने गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. केजरीवाल यांनी 15 हून अधिक सभा घेतल्या आहेत. पक्षाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या 7 याद्या जाहीर करण्यात आल्या असून यात 73 विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
 
आम आदमी पक्षाने गेल्या काही महिन्यांत येथे भरपूर प्रचार केला आहे. सध्या आम आदमी पक्षाचे संपूर्ण लक्ष सुरत आणि पाटीदार बहुल भागावर आहे. आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया हे स्वतः पाटीदार आंदोलनाशी जोडलेले असताना त्यांना पाटीदार समाजाचा पाठिंबा मिळत आहे. गुजरातमध्ये पाटीदार मतदारांची संख्या 15 ते 17 टक्के आहे.
 
सुरतमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली असल्याने पक्षाला हिंमत मिळत आहे. सुरत महापालिकेत 120 पैकी 27 जागा 'आप'ने जिंकल्या होत्या. म्हणजे आता 27 नगरसेवक आपचे आहेत. काँग्रेस पूर्णपणे बाहेर पडली असल्याने आम आदमी पक्ष आता गुजरातमध्ये काँग्रेसला पर्याय बनण्याच्या प्रयत्नात आहे.
 
दिल्लीनंतर अरविंद केजरीवाल यांना पंजाबमध्ये मोठा विजय मिळाल्याचा अभिमान आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांमध्येही ते प्रयत्नशील झाले आहेत. जिथे जिथे काँग्रेस कमकुवत झाली आहे, तिथे ते आपली ताकद वाढवत आहेत.
 
भाजपप्रमाणेच त्यांनी सोशल मीडियाला आपले मोठे हत्यार बनवले असले तरी येथे आप पक्षाचा फारसा प्रभाव पडेल असे सध्या तरी वाटत नाही. मात्र काही जागांवर पक्षामुळे भाजप आणि काँग्रेसला नक्कीच नुकसान पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.