गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (23:22 IST)

'आईचा प्रियकर मला आवडायचा, आम्हाला तिने पकडलं म्हणून आईचा खून केला'

भार्गव पारीख
  
“माझ्या आईचा प्रियकर माझ्यापेक्षा वयाने दुप्पट वयाचा होता, पण तो मला आवडायचा. मी त्याच्या प्रेमात पडले आणि एके दिवशी आम्हाला आईने पकडलं.”
 
“म्हणून मी माझ्या आईला मारून टाकलं. ती आमच्या प्रेमात अडथळा बनली होती. जर माझी कार त्यादिवशी समुद्रकिनारी वाळूत अडकली नसती, तर मी आज त्याच्यासोबत असते.”
 
पोलिसांनी पकडल्यानंतर टीनाने (बदललेलं नाव) हे सांगितलं. टीना अल्पवयीन आहे आणि सध्या बालसुधारगृहात आहे.
 
एका काऊन्सिलरच्या मदतीने बीबीसीने तिच्याशी संवाद साधला. तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
 
टीना आणि तिचा कथित प्रियकर योगेश जोटीया यांना मुद्रा सागरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर 38-वर्षीय गीताचा (बदललेलं नाव) खून केल्याचा आरोप आहे. त्यांनी तिचा मृतदेह कच्छजवळच्या हमीर मोर गावाजवळ समुद्रात फेकून दिल्याचाही आरोप आहे.
 
गीताची अल्पवयीन मुलगी टीना, योगेश जोटीया आणि नरेन जोगी यांना या प्रकरणी CrPC कलम 154 आणि भारतीय दंडसंहिता कलम 302 आणि 120 (ब) अंतर्गत अटक केली आहे.
 
पोलिसांना तपासाअंती लक्षात आलं की गीताचे योगेश जोटीयाशी कथित विवाहबाह्य संबंध होते. पण तिची मुलगी टीनाही त्याच्याकडे आकर्षित झाली होती.
 
योगेश आणि टीनाच्या प्रेमप्रकरणाबद्दल टीनाच्या आईला, गीताला कळल्यानंतर त्या दोघांनी मिळून गीताचा खून केला. त्यांनी कट रचून तिला ठार केलं. पण एका चुकीमुळे पकडले गेले.
 
कोण होती गीता?
गीता अहमदाबादमध्ये लहानाची मोठी झाली. तिच्या घराजवळ राहाणाऱ्या एका महिलेने बीबीसीला तिच्या आणि तिच्या कुटुंबाबद्दल सांगितलं.
 
गीताचा जन्म गरीब कुटुंबात झाला. तिच्या घरचे लोहारकाम करायचे. तिलाही लहानपणापासून हे काम करावं लागलं.
 
तिच्या शेजारी राहाणाऱ्या महिलेने सांगितलं, “गीताचं लग्न किशोर वेकारिया या मजुरांच्या ठेकेदाराशी झालं. या दांपत्याला चार मुलं झाली. तीन मुलं आणि एक मुलगी. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि गीता आपल्या बहिणीकडे कच्छमध्ये राहायला गेली.”
 
तिकडे पोहोचल्यानंतर गीता एका मजुराच्या प्रेमात पडली. त्याचं नाव जितेंद्र भट. दोघं एकाच बांधकामावर काम करत होते आणि त्यांनी लग्न केलं.
 
त्यावेळी गीताची दोन मुलं, एक सहा वर्षांचा मुलगा आणि एक आठ वर्षांची मुलगी तिच्याबरोबर राहात होते.
 
जितेंद्र आणि गीताने या मुलांना एकत्र वाढवायचं ठरवलं. नऊ वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. पण त्यांच्या सुखी संसारात एक वळण आलं.
 
जितेंद्र भट त्या त्रासिक दिवसांची आठवण सांगताना म्हणतात, “माधापारमध्ये आम्ही रंगाचं काम करत होते आणि तिथेच आम्हाला योगेशस जोटीया भेटला. त्याची आणि माझ्या बायकोची नजरानजर झाली. मी कामावर जायचो तेव्हा ते लपून भेटायचे आणि टीना हे माझ्यापासून लपवून ठेवायची.”
 
‘अंगावरच्या कपड्यांमुळे मृतदेहाची ओळख पटली’
पुढे काय झालं याची कहाणी सांगताना जितेंद्र म्हणतात, “गीताचं आणि योगेशचं प्रेमप्रकरण सुरू होतं तेव्हाच त्याने टीनालाही जाळ्यात ओढायला सुरुवात केली. तीही योगेशच्या प्रेमात पडली. त्याने दोघी आई-मुलीशी प्रेमसंबंध ठेवायला सुरुवात केली.”
 
जितेंद्र म्हणतात की यावरून गीता आणि टीनात भांडणही झालं.
 
ते म्हणतात, “मी 10 जुलैला कामावरून परत आलो तेव्हा मला टीनाने सांगितलं की गीता अंजारला गेलीये. दुसऱ्या दिवशी टीनाही तिच्या मावशीकडे जाण्यासाठी निघाली. 20 दिवस उलटून गेले तरी गीताचा फोन बंद येतोय आणि ती परत आली नाही हे पाहून जितेंद्रने माधापार पोलीस स्टेशनमध्ये गीता हरवल्याची तक्रार दाखल केली.
 
एकेदिवशी मुद्रा बंदराजवळ सापडलेल्या एका मृतदेहाचा फोटो माधापार पोलीस स्टेशनात दाखवण्यात आला. तेव्हा लक्षात आलं की गीताचा मृत्यू झालाय. जितेंद्र म्हणतात की गीताच्या कपड्यांवरून तिच्या मृतदेहाची ओळख पटवली.
 
ते सांगतात, “गीताच्या काळ्या रंगाच्या घागऱ्यावरून मी तिला ओळखलं. तिच्या गळ्यातली चेन, हार आणि लॉकेट पाहून मला कळलं की ही गीताच आहे.
 
समुद्रात फेकून दिलं
मुंद्रा बंदराच्या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जडेजा या केसबद्दल माहिती देताना म्हणतात, “13 जुलैला एका अज्ञात महिलेचा मृतदेह हमीर मोरा खेड्याजवळ सापडला. हा अगदीच विरळ लोकसंख्येचा भाग आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. मग आम्ही कच्छमधल्या सगळ्या पोलीस स्टेशनांमध्ये फोटो पाठवला. शेवटी 17 दिवसांनी मृतदेहाची ओळख पटली.”
 
जिथे मृतदेह सापडला तिथे फक्त मच्छीमार आणि गुराख्यांची ये-जा असते. त्यामुळे पोलिसांना काही माग लागत नव्हता. पण तिथल्या मोबाईल टॉवर्सचा डेटा काढल्यानंतर नवीन माहिती समोर आली.
 
पीएसआय जडेजा म्हणतात, “आम्हाला कळलं की काही दिवसांपूर्वी नरेन जोगी नावाच्या एका तरुणाला रात्री 3 वाजून 18 मिनिटांनी या भागातून फोन गेला होता.”
 
पोलिसांशी बोलताना सांगितलं की, “माधापारहून योगेश वॅगन-आर कारमधून इथे आला होता. पण त्याची गाडी वाळूत अडकल्याने त्याने मला रात्री फोन केला. त्याला मदत करताना मला दिसलं की त्याच्या गाडीत एक अल्पवयीन मुलगी आहे.”
 
पोलिसांनी नरेन जोगीचे कॉल डिटेल्स काढल्यावर कळलं की त्याने 10 जुलैला त्याला योगेश जोटीयाने फोन केला होता.
 
पोलिसांना दिलेल्या जबाबात नरेनने सांगितलं की, “योगेश त्याची प्रेयसी गीता आणि तिची मुलगी टीनाला घेऊन फिरायला या भागात आला आला होता. मीही त्यांच्यासोबत गेलो. तिथे गीता आणि योगेशचं भांडण झालं आणि तिने टीनासोबत त्यांचे संबंध संपुष्टात आणण्यासाठी सांगितलं.”
 
“हे लोक पुढे एका निर्जन स्थळी गेले. तिथे यांनी गीताचा खून केला आणि तिला समुद्रात फेकून दिलं. हे लोक तिथून निघाले पण त्यांची कार वाळून अडकली. मग त्यांनी मला रात्री पुन्हा फोन केला. मी त्यांना कार काढायला मदत केली. तिथून आम्ही टीनाला लोणीला सोडलं आणि आम्ही माधापारला गेलो.”
 
रात्री जो फोन योगेशने नरेनला केला होता, त्याच फोनमुळे पोलिसांना या खूनाचा सुगावा लागला आणि आरोपी पकडले गेले.
 
टीना आणि योगेशला अटक केल्यानंतर त्यांनी लगेचच खुनाची कबुली दिली.
 
पीएसआय जडेजा सांगतात, “त्यांनी आपल्या जबाबात म्हटलं की गीता टीनावर दबाव टाकत होती की तिने योगेशशी असलेले आपले संबंध तोडावेत. वाद शमवण्यासाठी आपण पिकनिकला जाऊ असं टीनाने म्हटलं. निर्जन स्थळी नेऊन गीताचा खून करण्याची योजना या दोघांनी आखली. चार तासांचा प्रवास करून माधापारहून ते हमीर मोराला गेले. पण गीताचा खून करून समुद्रात तिचा मृतदेह फेकून येताना त्यांची कार वाळूत अडकली आणि योगेशला नरेनला फोन करावा लागला. त्या फोनमुळे या गुन्ह्याची उकल झाली. नाहीतर त्यांनी आपले फोन बंद ठेवले होते.”
 
बीबीसी गुजरातीने अहमदाबादमध्ये राहाणाऱ्या गीताच्या भावालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी याबद्दल काही बोलण्यास नकार दिला.