शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 14 मे 2023 (17:05 IST)

कर्नाटक : डी. के. शिवकुमार आतापर्यंत मुख्यमंत्री का बनले नाहीत?

DK Shivakumar
कर्नाटकात काँग्रेसनं विजयी बाजी मारली आहे. या विजयात कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचं योगदानही महत्त्वाचं मानलं जातंय.
 
कर्नाटकातील विजयाबाबत बोलताना काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. सर्वांनी मिळून केलेल्या कामाचं हे यश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
हा संपूर्ण कर्नाटकाचा विजय आहे. मी कर्नाटक जिंकून देईल हे आश्वासन पक्षश्रेष्ठींना दिलं होतं. ते पूर्ण केलं आहे, असंसुद्धा शिवकुमार यांनी म्हटलंय.
 
एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार स्थापन व्हावं यासाठी डी. के. शिवकुमार यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यात ते यशस्वीदेखील झाले होते पण त्याहून अधिक प्रयत्न त्यांनी हे सरकार टिकवण्यासाठी केले. पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि कुमारस्वामी सरकार कोसळलं.
 
त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेली एक नजर.
 
'ते' आणि बदनामी हा शब्द हातात हात घालूनच चालतात. कधीकधी बदनामी त्यांच्याआधी दोन पावलं पुढं चालत असते. कदाचित म्हणूनच ते माध्यमांमध्ये कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.
 
काही दिवसांपूर्वी ते मुंबई पोलिसांशी आक्रमकपणे बोलताना दिसले, तर कधी आव्हान देताना. ते आहेत डी. के. शिवकुमार.
 
"कितीही घोषणा द्या, हा डी. के. शिवकुमार कुणालाही घाबरणारा नाही. मी एकटाच आलोय आणि एकटाच इथून जाणार आहे."
 
हा डायलॉग ऐकायला फिल्मी वाटेल, पण डी. के. शिवकुमार स्वत:ची ओळख अशाच पद्धतीने करुन देतात. कर्नाटकात डी. के. शिवकुमार केवळ 'डीके' नावाने परिचित आहेत आणि याच नावाने ते लोकप्रिय आहेत.
डी. के. शिवकुमार यांच्या आक्रमक आणि धडाकेबाज कामगिरीला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा हेही दुजोरा देतात.
 
कर्नाटक विधानसभेला बरखास्त करण्याच्या मागणीसाठी बंगळुरुत धरणं आंदोलन करणाऱ्या येडियुरप्पा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, "लोक डी. के. शिवकुमार यांच्या 'वागण्याला' विसरले नाहीत. ते अशा प्रकारची प्रकरणं सांभाळण्यात तरबेज आहेत."
 
येडियुरप्पा यांनी आपल्या विधानाला दुजोरा देण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरातचं उदाहरण दिलं होतं. त्यावेळी डी. के. शिवकुमार यांनी 'पक्षाच्या हितासाठी आमदारांना आश्रय दिला होता.'
 
कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल युनायटेडचं (जेडीएस) आघाडी सरकार सध्या कोसळण्याच्या स्थितीत आहे. मात्र, तरीही दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आपापल्या घरात आरामात बसलेत किंवा अधून-मधून निदर्शनं करत आहेत. मात्र, डी. के. शिवकुमार यांनी सगळ्यांपेक्षा वेगळी वाट चोखाळली आहे.
 
इतर नेत्यांपेक्षा हटके स्टाईल
काँग्रेसचे आमदार कोंडजी मोहन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन इतर नेत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यांच्याकडे अफाट क्षमता आहे. रुळलेल्या वाटा बदलण्यात ते तरबेज आहेत आणि पक्षाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेवर कुणीच शंका उपस्थित करु शकत नाही."
 
काँग्रेस प्रचार समितीचे सरचिटणीस मिलिंद धर्मसेन म्हणतात, "डी. के. शिवकुमार यांना शालेय जीवनापासून पाहतोय. आम्ही दोघेही सथनूर गावातील आहोत. लोक कायम अंतिम निकालाबाबत काळजीत असतात. मात्र, डीके कधीच कुठल्या गोष्टीला घाबरून राहत नाहीत. कुठलीही गोष्ट त्यांनी त्यांनी एकदा हातात घेतली, तर ती पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत."
 
गुजरात राज्यसभा निवडणुकीदरम्यान ज्याप्रकारे डी. के. शिवकुमार यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात बलाढ्य नेते आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भिडले, त्यावरुन मिलिंद धर्मसेन यांचं विधान एका मर्यादेपर्यंत खरंही वाटतं.
 
नाव न जाहीर करण्याच्या अटीवर डी. के. शिवकुमार यांच्या एका सहकाऱ्याने बीबीसीला सांगितलं, "गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीवेळी तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी या जोडीविरुद्ध थेट भिडले होते.
 
सर्वांना माहित होतं की, डीके मोठं आव्हान पेलत आहेत आणि त्याच्या परिणामांचा ते अजूनही सामना करत आहेत. मात्र डीके असेच आहेत."
 
डीके असे का आहेत?
आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर डीकेंच्या निकटवर्तीयाने बीबीसीला सांगितलं, "ते महत्त्वाकांक्षी आहेत आणि मुख्यमंत्री बनण्याचीही त्यांची इच्छा आहे. मुख्यमंत्री बनण्यासाठी ते शक्य तेवढे प्रयत्न करतील. आपल्या नशिबात मुख्यमंत्री बनणं लिहिल्याचं डीके मानतात."
 
मिलिंद धर्मसेनही म्हणतात की, डीकेंचं वागणंही असंच काहीसं राहिलं आहे.
धर्मसेन म्हणतात, "निवडणूक लढण्यासाठी डीकेंनी स्वत:ची जमीन गहाण ठेवली होती. 1985 साली काँग्रेसचा उमेदवार या नात्याने सथनूरमधील (बंगळुरु ग्रामीण जिल्ह्यातील गाव) तरुणांना एकत्रित करण्याचं काम केलं होतं. मात्र, एचडी देवेगौडा यांच्याविरोधात ते निवडणूक जिंकू शकले नाहीत."
 
प्रत्येक बाजी सुपरहिट
पाच वर्षांनंतर काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही. मात्र, डी. के. शिवकुमार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले आणि इतिहासही रचला. वोक्कलिग समाजाचे ताकदवान नेते देवेगौडा पराभूत झाले होते. त्यानंतर 10 वर्षांनी डीकेंनी विधानसभा निवडणुकीत देवेगौडा यांचा मुलगा एचडी कुमारस्वामी यांना पराभूत केलं होतं.
 
त्यानंतर कर्नाटकात सर्वात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत कनकपुरा लोकसभा मतदारसंघातून तेजस्विनी यांना तिकीट दिलं आणि देवेगौडा यांना पराभूत केलं. तेजस्विनी यांना राजकारणाचा काहीही अनुभव नव्हता.
 
मात्र त्यांनंतर ज्यावेळी काँग्रेसने जेडीएस आणि देवेगौडा कुटुंबाशी हातमिळवणी करुन कर्नाटकात आघाडीचं सरकार बनवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी एका निष्ठावान कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारला.
 
त्यांच्यासोबत काम केलेल्या एका काँग्रेस नेत्याचं म्हणणं आहे की, देवेगौडा कुटुंब आणि वोक्कलिग समाजाविरोधातील नेता अशी कित्येक वर्षांपासूनची तयार झालेली प्रतिमा डी. के. शिवकुमार यांनी काही क्षणात बदलली. याचा अर्थ असा, त्यांना वाटतं की ज्यावेळी गरज पडेल, त्यावेळी ते त्यांचीही सोबत देतील.
 
भविष्यकालीन विचार करुन निर्णय
 
भविष्यातल्या गोष्टींसाठी गुंतवणूक करण्याकडेच डी. के. शिवकुमार यांचा कल असतो. धर्मसेन म्हणतात, "त्यांनी मला सांगितलं होतं की, मुर्ख बनू नका आणि जमिनीत गुंतवणूक करा. केवळ जमीनच अशी गोष्ट आहे, ज्यातून चांगला परतावा मिळू शकतो. त्यांनी अशा अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या, ज्या त्यावेळी ओसाड किंवा वाळवंटासारख्या होत्या. मात्र, त्यांची दूरदृष्टी कमाल होती की, काही वर्षानंतर त्याच जमिनीच्या किंमती महागल्या."
 
रिअल इस्टेट, ग्रॅनाईट आणि शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये रस असणारा माणूस म्हणून डी. के. शिवकुमार यांना ओळखलं जातं.
 
जुने-जाणते काँग्रेस नेते एल.एन. मूर्ती सांगतात की, "त्यांच्या कुटुंबीयांकडे कनकपुरामध्ये जमीन होती. त्यानंतर ज्यावेळी 80 च्या दशकात माझा सहकारी म्हणून ते काम करण्यासाठी आले, तेव्हा एखादं काम करण्याची त्यांची एक स्वत:ची शैली होती. अत्यंत कष्टाळू होते. अनेकांना वाटायचं की ते वादग्रस्त स्वभावाचे आहेत. मात्र, तसे नव्हते. त्यांच्याविरोधात एकही तक्रार नव्हती. ते प्रचंड साधे आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्त्वही तसेच आहे."
 
मूर्ती पुढे म्हणतात, "ज्यावेळी डी. के. शिवकुमार यांनी मुंबई पोलिसांना म्हटलं की, 'मेरे पास कोई हथियार नहीं है, सिर्फ़ एक दिल है', त्यावेळी खरंतर त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता."
 
डीके आतापर्यंत मुख्यमंत्री का बनले नाहीत?
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्विनी गौडा म्हणतात, "जर त्यांनी दुसऱ्यांना पुढे जाऊ दिलं असतं, तर ते मुख्यमंत्री बनले असते. मात्र, आपल्यापुढे कुणीही गेलेलं त्यांना खपत नाही. मी माझ्याबाबत हे सांगत नाहीये. योगेश्वर किंवा एसटी सोमशेखर यांच्याकडे तुम्ही पाहा ना. ते त्यांच्या अहंकारातून बाहेरच येत नाहीत."
 
मात्र, डी. के. शिवकुमार कधी ना कधी मुख्यमंत्री बनतील, असं काँग्रेसमध्ये अनेकांना वाटतं.
 
डीकेंनी ज्यावेळी राजकारणात पाऊल ठेवलं, त्यावेळी ते केवळ बारावी पास होते. त्यानंतर राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी संस्कृतमध्ये श्लोक वाचणंही शिकून घेतलं. तसेच, बाराव्या शतकातील महान संत बसवेश्वरांचे विचारही वाचले. संत बसवेश्वरांना मानणाऱ्यांची कर्नाटकच्या उत्तरेकडील भागात प्रचंड मोठी संख्या आहे.
 
डी. के. शिवकुमार यांना स्वत:लाही विश्वास आहे की, आपली वेळ येईल. कारण ते स्वत:ला अजूनही तरुण मानतात, जरी ते सध्या 57 वर्षांचे आहेत.



Published By - Priya Dixit