शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (16:53 IST)

Kirit Somayya: या 6 प्रकरणांमध्ये नेत्यांना बसला होता अश्लिल फोटो-व्हीडिओचा फटका

Kirit Somayya एका मराठी वृत्तवाहिनीने भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह अवस्थेतील व्हीडिओ प्रदर्शित केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडालीय.
 
भारतातील राजकीय नेत्यांच्या अशा प्रकारच्या अश्लील चित्रफिती किंवा छायाचित्रं प्रसिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीदेखील महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांचं नाव अशा प्रकरणात समोर आलं आहे.
 
अश्लील फोटो आणि व्हिडीओचा प्रभाव एवढा राहिला आहे की भारताचे पहिले दलित पंतप्रधान होऊ पाहणाऱ्या एका मातब्बर राजकीय नेत्याला त्यांच्या मुलाच्या अश्लील फोटोमुळे पंतप्रधानपदापासून आयुष्यभर दूर राहावं लागलं, तर काही नेत्यांना अत्यंत महत्वाच्या राजकीय पदांचा राजीनामा द्यावा लागला आहे.
 
अशा प्रकारच्या अश्लील चित्रफिती आणि छायाचित्रांमुळे राजकीय जीवनात नुकसान झालेले भारतातील नेते कोण होते? ते नेमके कोणत्या प्रकरणांमध्ये अडकले होते याचाच हा आढावा.
 
1978 मध्ये भारताच्या राजकारणातले अश्लील फोटो आणि व्हीडिओंचं सगळ्यांत जुनं प्रकरण घडलं होतं. त्यावर्षी जगजीवन राम हे स्वतंत्र भारताचे पहिले दलित पंतप्रधान होऊ शकले असते पण त्यांचा मुलगा सुरेश राम याचा एक नग्न फोटो प्रकाशीत झाला आणि त्यावेळी देशाचे उपपंतप्रधान असणारे जगजीवन राम हे देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत.
 
'सूर्या' नावाच्या नियतकालिकाने त्यांचा मुलगा सुरेश राम याचे आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्र प्रकाशित केलं होतं. विशेष बाब म्हणजे या नियतकालिकाचे संपादन भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुनेने म्हणजेच मनेका गांधी यांनी केलं होतं.
 
1997 मध्ये भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या गोपीनाथ मुंडे यांचा तमाशा कलावंत बरखा पाटील यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता.
 
त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या एका सभेत या प्रकरणाची खिल्ली उडवताना म्हणाले होते की ''मी मुंडेंना म्हणालो होतो जब प्यार किया तो डरना क्या?''
 
गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले, हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा पलटवार करण्याचा प्रयत्नही केला, पण ज्या वर्तमानपत्राने त्यांच्यावर हे आरोप केले होते त्या वर्तमानपत्राविरोधात अधिकृत तक्रार देण्याचं मात्र त्यांनी टाळलं होतं.
 
2. एनडी तिवारींना सोडावं लागलेलं राज्यपालपद
अशा आरोपांमुळे चर्चेत असलेलं आणखीन एक नाव म्हणजे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांचे मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांचं.
 
2009 मध्ये आंध्र प्रदेशचे राज्यपाल असताना त्यांच्यावर राजभवनातील सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचे आरोप झाले आणि त्याकाळी 85 वर्षांच्या असणाऱ्या तिवारींनी राज्यपाल पद सोडलं होतं.
 
त्यानंतर 2012 मध्ये रोहित शेखर तिवारी यांनी एन. डी. तिवारी हेच माझे जैविक वडील असल्याचा दावा केला होता. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेलं, न्यायालयाने डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आणि 27 जुलै 2012 ला एन. डी. तिवारी हेच शेखर तिवारी यांचे वडील असल्याचं सिद्ध झालं होतं.
 
सप्टेंबर 2013 मध्ये आणखीन एका प्रकरणात एन. डी. तिवारी एका टीव्ही कार्यक्रमाच्या तरुण निवेदिकेसोबत नाचताना दिसले पण यात आक्षेपार्ह गोष्ट ही होती की ज्या कार्यक्रमात ते नाचत होते तो कार्यक्रम लखनौमध्ये शहिदांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेला होता.
 
3. अभिषेक मनू सिंघवींना द्यावा लागला होता राजीनामा
ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हेदेखील यातून वाचले नाहीत
 
2012 मध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांच्यावर देखील सर्वोच्च न्यायालयाच्या चेंबरमध्ये महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
अभिषेक मनू सिंघवी यांची 'त्या' अवस्थेतील सीडी बनवल्याचा आणि त्या सीडीचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांचा ड्रायव्हर मुकेश कुमारलाल याच्यावर करण्यात आलेला होता.
 
या प्रकरणात नाव आल्याने सिंघवींना त्यांच्या प्रवक्तेपदाचा आणि एका संसदीय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
 
4. 2011 चे भंवरीदेवी प्रकरण
2011 मध्ये राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला हादरवणारं भंवरीदेवी प्रकरण त्याकाळी खूप गाजले होते. राजस्थान सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असणारे महिपाल मदेरणा यांच्यावर या प्रकरणात सहभागी असल्याचे आरोप झाले होते.
 
मदेरणा आणि आणखीन काही लोकांसोबत आक्षेपार्ह अवस्थेतील काही व्हीडिओ क्लिप्सचा सौदा करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप करण्यात आले आणि त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
 
भंवरी देवी या एक सहाय्यक परिचारिका होत्या. त्या बेपत्ता झाल्या आणि त्यांच्या नवऱ्याने मंत्री असणाऱ्या महिपाल मदेरणा यांच्यावर भंवरीदेवी यांचे अपहरण केल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं.
 
5. 'आम आदमी पक्षा’च्या मंत्र्याची हकालपट्टी
2016 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सगळ्यात तरुण मंत्री संदीप कुमार यांची एका अश्लील व्हीडिओ असणाऱ्या सीडीमुळे हकालपट्टी केली होती.
 
केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात बालकल्याण आणि सामाजिक न्याय मंत्री असणाऱ्या संदीप कुमार यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हीडिओ अरविंद केजरीवाल यांच्या हाती लागले आणि अर्ध्याच तासात संदीप कुमार यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करावी लागली.
 
केजरीवाल यांनी ट्विटरवरून संदीप कुमार यांची हकालपट्टी केल्याची घोषणा केली होती.
 
6. कर्नाटकात काय घडलं होतं?
डिसेंबर 2016 मध्ये कर्नाटकचे माजी मंत्री एच. वाय. मेती यांना त्यांचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
 
या व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेने मेती यांच्यावर बलात्काराचे आरोप लावले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामैया यांचे निकटवर्तीय म्हणून मेती ओळखले जायचे.
 
त्यानंतर 2021 मध्ये भाजपच्या रमेश जारकीहोळी यांना जलसंपदा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एका कन्नडा वृत्तवाहिनीवर रमेश जारकीहोळी यांचे काही महिलांसोबतचे अश्लील व्हीडिओ व्हायरल झाले होते.