उत्तराखंडमधील केदारनाथ येथे 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 जून 2013 ढगफुटी विनाशकारी पूर आणि भूस्खलन झालं होतं. या पूरात गावच्या गावं नष्ट झाली, मोठी जीवितहानी झाली होती. काहींचे मृतदेह तर मिळालेच नाहीत.
या घटनेला आज 10 वर्ष उलटून गेली. ही दुर्घटना घडली तेव्हा राम करण बेनिवाल आणि त्यांचं कुटुंब केदारनाथ मंदिर परिसरात होतं. या दिवसाच्या आठवणीत ते सांगतात, या पुरात माझं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं.
बेनिवाल सांगतात, "मी, माझी पत्नी, माझे दोन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि एक नातेवाईक असे एकूण सात जण 9 जून 2013 रोजी राजस्थानच्या जोधपूरहून केदारनाथच्या दिशेने रवाना झालो. आमच्या मुलांच्या शाळा असल्याने ते काही आमच्यासोबत येणार नव्हते.
मी आणि माझ्या पत्नीने चारधाम पैकी बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या हिंदू तीर्थक्षेत्रांची आधीच यात्रा केली होती. यातल्या केवळ केदारनाथ तीर्थक्षेत्राची यात्रा बाकी होती.
16 जूनला आम्ही केदारनाथ मंदिरात पोहोचलो. तिथलं दर्शन आटोपून आम्ही रामबाडाच्या दिशेने निघालो. हे गाव भक्तांसाठी विश्रांतीचं ठिकाण आहे.
रस्त्यात असतानाच मुसळधार पाऊस कोसळू लागला. आम्ही सायंकाळी 5 च्या सुमारास रामबाडा गावात पोहोचलो आणि तिथेच रात्र घालवण्याचा निर्णय घेतला.
रात्रभर आम्ही अलकनंदा नदीच्या किनारी बसून रामनामाचा जप करत होतो. अचानक दरड कोसळल्याचा आवाज माझ्या कानावर आला."
"असं वाटत होतं की, पर्वत थरथरू लागलेत. अंधार दाटल्याने आम्हाला स्पष्ट काही दिसत नव्हतं. त्यानंतर मागून मोठमोठे दगड कोसळू लागले. या दगडांसोबत लोकही पाण्यात वाहून जाऊ लागले.
मी माझ्या पत्नीला आणि एका वहिनीला नदीत वाहून जाताना पाहिलं. त्यानंतर माझा भाऊ वाहून गेला.
माझे इतर नातेवाईक त्या अंधारात कुठे गेले मला समजलंच नाही. मी पळत जाऊन एका मोठ्या दगडाच्या आडोशाला थांबलो."
"त्या डोंगरांवर मोठमोठी झाडं होती. झाडं जमिनीत खचली होती. त्या तुलनेत दरड मात्र मोठ्या प्रमाणावर कोसळत होती. मी लगेचच डोंगराच्या वरच्या दिशेने जाऊन एका झाडाचा आसरा घेतला. माझ्या डोळ्यासमोर एक अख्खा डोंगर नदीमध्ये विलीन झाल्याचं मी पाहिलं."
"हे दृश्य बघून माझं मन सुन्न झालं होतं, मला काहीच सुचत नव्हतं. कडाक्याची थंडी होती, माझे कपडे पावसात चिंब झाले होते. माझ्या आसपास काही लोकांनी झाडांचा आसरा घेतला होता. पण कोणाच्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मरणासन्न शांतता होती. झाडाला पकडताना माझा खांदा सरकला होता. त्याच्यावर उपचार केले मात्र आजही तो दुखत असतो."
"महापूर आणि भूस्खलन सुरूच असल्यामुळे पुढचे चार दिवस मी त्या झाडाच्या आधारावरच होतो. मी इतर झाडांना बिलगून बसलेल्या लोकांना भूक, तहान आणि थंडीने मरताना पाहिलंय."
मोबाईलचे सगळे टॉवर वाहून गेले होते. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला होता. त्यामुळे आता इथून जिवंत बाहेर पडण्याची काहीच चिन्हं नाहीत, आता फक्त देवच काहीतरी चमत्कार करू शकतो असं माझ्या मनात आलं.
20 जूनला एक हेलीकॉप्टर आलं. हवामानाची परिस्थिती बघून एकावेळी फक्त पाचच लोकांना वाचवलं जात होतं. हेलीकॉप्टरमध्ये बसल्यावर आम्हाला केदारनाथ जवळच्या गुप्तकाशी शहरात सोडण्यात आलं. तिथून देहरादूनला जाण्यासाठी आम्ही आणखीन एक हेलीकॉप्टर बदललं. तिथून पुढे मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
चार पाच दिवस पोटात अन्नाचा कण नाही, पाण्यात भिजून गारठल्यामुळे शरीराला थकवा आला होता. शरीराची त्वचा भिजून भिजून खराब झाली होती. शेवटी माझ्या मुलीशी संपर्क साधण्यात मला यश आलं. पण एकटाच वाचलोय हे कळताच तिने फोन ठेऊन दिला. त्यानंतर माझे मेहुणे आणि पुतण्या मला न्यायला डेहराडूनला आले.
आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण निदान आपले वडील तरी या दुर्घटनेतून वाचले म्हणून माझी मुलं कृतज्ञता व्यक्त करत होती. माझी पत्नी आणि इतर नातेवाईकांचे मृतदेह मिळाले नाहीत.
आपली आई कशीतरी वाचली असेल, ती जिवंत असेल. आणि एक दिवस ती नक्की घरी येईल या आशेवर माझी मुलं एकेक दिवस ढकलत होती. पण मी जे पाहिलं होतं त्यावर माझा विश्वास होता, कालांतराने मुलांनाही या वास्तवाशी जुळवून घ्यावं लागलं.
दहा वर्षांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. लोकांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं.
मला अजूनही गौरीकुंड (केदारनाथ मंदिराचा प्रारंभ बिंदू) जवळची पार्किंगची जागा आठवते. त्या पार्किंगमध्ये जवळपास 5,000 गाड्या उभ्या होत्या. आमचीही गाडी तिथेच उभी होती. आम्ही सर्वस्व गमावलं होतं.
ही नैसर्गिक आपत्ती देवाचीच इच्छा असेल. मला वाटतं आयुष्य एकप्रकारे रेल्वेचा प्रवास आहे. इथे आपलं स्टेशन आलं की उतरावंच लागतं. कदाचित केदारनाथ माझ्या पत्नीचं शेवटचं स्टेशन असावं.
आज माझं मन रमवण्यासाठी मी देवाच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करतो. तुम्ही जर मला विचारलं की, पुन्हा केदारनाथच्या यात्रेला जाल का? तर याचं उत्तर असेल, नक्कीच! भीतीच्या छायेत जगण्यात काही अर्थ नाही, आणि आता भीती उरली नाही. खरं तर मी माझ्या मुलांनाही या यात्रेला घेऊन जाईन.