बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 21 जून 2021 (08:54 IST)

शरद पवार दिल्लीत दाखल; राजधानीतील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज्यात मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. केरळमधील प्रमुख नेत्यांशी पवार यांची भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 
 
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं सातत्याने बोललं जात आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा आता जोर धरु लागली आहे. अशावेळी पवारांचा दिल्ली दौऱ्याकडे महाविकास आघाडीतील घटकपक्षांसह भाजपचंही लक्ष लागलं आहे. पवार आपल्या दिल्लीवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी शिवसेनेचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची पार्श्वभूमीवर होती. शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही. पण हा महाराष्ट्र शिवसेनेला काम करताना गेली अनेक वर्षांपासून पाहतोय. माझं स्वत:चा यापूर्वीचा अनुभव एक विश्वास असावा असाच आहे. एक साधं उदाहरण सांगतो, ज्यावेळेला देशात जनता पक्षाची सत्ता आली. त्यावेळी सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असतानाही अशा स्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला. तो राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेना फक्त पुढे आली नाही, तर त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की, या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना विजयी करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही.
 
तुम्ही विचार करा की, विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि पक्षाचा नेता असा निर्णय घेतो की, आम्ही निवडणुकाच लढणार नाही. त्या नेत्याची स्थिती काय होईल. पण त्याची चिंता कधी बाळासाहेब ठाकरेंनी बाळगली नाही. त्यांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला, हा इतिहास विसरता येत नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेनं ज्या पद्धतीने, ज्या कालखंडात ही ठाम भूमिका घेतली, ती भूमिका ते बदलतील असे आडाखे कुणी बांधत असेल तर ते वेगळ्या नंदनवनात राहतात, एवढंच मी सांगेल. हे सरकार ५ वर्षे टिकेल, काम करेल. फक्त ५ वर्षे नाही तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्र काम करुन सामान्य जनतेचं प्रभावीपणे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असं भाकीतही पवारांनी त्यावेळी केलं होतं.
 
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानंतर शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती.