बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (14:50 IST)

कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या: जबाबदार कोण, कोचिंग सेंटर की आणखी कोण ? ग्राउंड रिपोर्ट

suicide
विनीत खरे
 जानेवारी महिना होता आणि 21 वर्षांचा विजय राज (नाव बदलले आहे) खूप अस्वस्थ होता.
 
नीट (NEET) परीक्षेत तो दोनदा नापास झाला होता आणि मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेत पुन्हा नापास होण्याची भीती वाटत होती.
 
भौतिकशास्त्र हा विषय त्यांच्यासाठी खूप कठीण होता. याशिवाय कोचिंग इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत परीक्षेतील खराब कामगिरीचाही त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला होता.
 
शेतकरी कुटुंबातून आलेला विजय हा तणाव आणि चिंतेत होता त्यांच्या छातीत दुखत होता. अनेकवेळा समस्यांवरून लक्ष वळवण्यासाठी तो मोबाईलवर रिल्स आणि शॉर्ट्स बघायचा, त्यामुळं त्याचा अधिक वेळ वाया जायचा. त्याच्या पालकांना चिंता वाटू नये म्हणून, तो टेस्ट परीक्षांमधील खराब कामगिरीबद्दल घरी अनेकदा खोटं बोलला.
 
कोटामध्ये वर्षानुवर्षे शिकलेला विजय म्हणाला, "मानसिक तणावामुळं मी पहिल्यांदा आत्महत्येचा विचार केला. मी माझ्या आई वडिलांना याविषयी काही सांगितलं नाही. त्यांनी काळजी करू नये असं मला वाटत होतं."
 
परिस्थिती इतकी बिकट झाली की एकदा त्याला आत्महत्या करावी असं वाटत होतं.
 
तो सांगतो, "मला असं वाटलं की माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. मला असं वाटलं की मी माझ्या कुटुंबाचा पैसा वाया घालवला आणि त्यांची प्रतिष्ठा कमी केली." तो तिसऱ्यांदा नीट ( NEET) मध्ये नापास झाला.
 
मोठ्या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयात मुलांचा प्रवेश ही भारतीय कुटुंबांसाठी अभिमानाची बाब आहे आणि अपयशाकडे तुच्छतेनं पाहिलं जातं.
 
डिप्रेशन आल्यास मदत घ्यावी
डिप्रेशन बद्दल खुलेपणानं बोलण्याची प्रेरणा विजयला अभिनेत्री दीपिका पादुकोणकडून मिळाली आणि सामाजिक दृष्टीकोनाकडे दुर्लक्ष करून, त्यानं मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. आज त्याची प्रकृती बरी आहे.
 
पण 18 वर्षांचा आदर्श राज इतका भाग्यवान नव्हता. त्याला डॉक्टर व्हायचं होतं. त्यांचं शेतकरी कुटुंब बिहारमध्ये 900 किलोमीटर दूर राहतं. आदर्शच्या मृत्यूनं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
 
त्याचे काका हरिशंकर प्रसाद सिंह यांनी सांगितलं की, आदर्शला काही काळापासून कोचिंग टेस्टमध्ये कमी गुण मिळत होते.
 
ते म्हणाले की "निकालात कमी गुण मिळाल्यानं नैराश्यातून त्यानं असं पाऊल उचललं असं आम्हाला वाटतं. हा त्याचा स्वभाव नव्हता. पण काही वेळा चांगली माणस ही चुकीचं पाऊल उचलत असतात, पण या समस्येवरचा उपाय म्हणजे आत्महत्या नव्हे. नीट (NEET) परीक्षेत बसलेले सगळेच डॉक्टर होतात का?"
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटामध्ये गेल्या 10 वर्षांत 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीय. यावर्षी आतापर्यंत 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. गेल्या वर्षी हा आकडा 15 होता.
 
तणाव किती मोठं कारण आहे?
एका विश्लेषणानुसार, आत्महत्या केलेले बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये मुलांचं प्रमाण अधिक होतं. जे ‘नीट’ची (NEET) तयारी करत होते. अनेक विद्यार्थी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील होते.
 
आकडेवारीनुसार, कोटामधील बहुतांश विद्यार्थ्यांचं वय 15 ते 17 या दरम्यान आहे. घरच्यांच्या अपेक्षा, रोज 13-14 तासांचा अभ्यास आणि टॉपर्ससोबतच्या खडतर स्पर्धेचं दडपण या सगळ्याच्या जोरावर शहरात एकटं राहणं त्यांच्यासाठी सोपं नाही.
 
आदर्शच्या काकांच्या म्हणण्यानुसार, त्यानं यापूर्वी कोटामध्ये आत्महत्या केल्याचं ऐकलं नव्हतं आणि त्यांनी आदर्शवर कधीही दबाव आणला नाही.
 
सरकारी आकडेवारीनुसार, 2021 मध्ये भारतात 13 हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे आकडे 2020 च्या आकडेवारीपेक्षा 4.5 टक्के जास्त आहेत.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी अंदाजे सात लाख लोक आत्महत्या करतात आणि आत्महत्या हे 15-29 वयोगटातील मृत्यूचं चौथ प्रमुख कारण आहे.
 
कोविड हे देखील एक कारण आहे का?
कोटामध्ये साडेतीन हजार वसतिगृह आणि हजारो घरांमध्ये दोन लाख विद्यार्थी राहतात.
 
कोटामध्ये अनेकांनी जीव गमावला. लोक दुःखी आहेत आणि यावर्षी आत्महत्यांच्या वाढलेल्या संख्येसाठी कोविडला जबाबदार धरलं जात आहे.
 
असा एक मत आहे की कोविडच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं खूप नुकसान झालं आणि जेव्हा ते कोटा मध्ये पोहोचले तेव्हा अत्यंत खडतर स्पर्धेतून अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले.
 
नुकत्याच प्रकाशित झालेल्या विश्लेषणानुसार, कोविडच्या काळात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही शिकण्याचा उत्साह कमी झाल्याचं दिसून आला.
 
शिक्षणतज्ज्ञ उर्मिल बक्षी सांगतात, “कोविडनंतर मुलं शाळेत परतली खरी पण तेव्हा त्यांची लिहिण्याची क्षमता नाहीशी झाली होती. मुलांची संवाद साधण्याची क्षमता नाहीशी झाली होती. आम्हाला सुरुवातीपासून सुरू करावं लागल, जसं विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद कसा साधायचा, शिक्षकांशी कसा संवाद साधायचा.
 
कोटा येथील अग्रगण्य कोचिंग इन्स्टिट्यूट मोशन एज्युकेशनचे व्यवस्थापकीय संचालक नितीन विजय सांगतात की, "कोविड नंतर आलेली मुलं, त्यांची तणाव सहन करण्याची क्षमता थोडी कमी झाली आहे, परंतु काळानुरुप त्यांच्यात बदल होतील."
 
कोविड दरम्यान सर्व शिक्षण ऑनलाइन झाल्यामुळं मुलं एकाकी पडली आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या हातात स्मार्टफोन सोपवावा लागला.
 
मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात?
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. एम.एल. अग्रवाल सांगतात, "स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात आले. काही मुलांनी त्याचा गैरवापर केला. त्यामुळं मुलांना इंटरनेटची चटक लागली. मुलं कोचिंग बंक करू लागले, आणि त्यातून मागे पडू लागले. जेव्हा मुलं मागे पडतात, तेव्हा ते डिप्रेशन मध्ये जातात. मग आत्महत्येकडे वळतात. इथलं कोचिंग हे खूप ‘फास्ट’ आहे. जर तुम्ही एक-दोन-चार दिवस अनुपस्थित राहिलात तर त्या दिवशीची भरपाई होत नाही, पुढील अभ्यासात तुम्हाला काही कळणार नाही."
 
200-300 विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्गात एकदा मागे राहिलो की अभ्यासक्रमात पकड घेणं सोपं नसतं आणि मग ताण वाढतो. त्याचा परिणाम टेस्टमध्ये दिसून येतो, ज्यामुळं तणाव आणखी वाढतो. .
 
एका तज्ज्ञाच्या मते, कोटामधील बहुतांश विद्यार्थी हे 15 - 17 वर्षे वयोगटातील आहेत. त्यांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा काळ आहे परंतु प्रत्यक्षात अजून लहान मुलंच आहेत.
 
डॉ. एम.एल. अग्रवाल सांगतात, "जेव्हा मुलं इथं येतात तेव्हा या वयात त्यांच्यात शारीरिक विकास, मानसिक विकास, हार्मोनल बदल होत असतात"
 
हेल्पलाइन आणि समुपदेशन
एका व्यापारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, शहराची अर्थव्यवस्था पाच हजार कोटींहून अधिक आहे आणि ही अर्थव्यवस्था इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे.
 
कोटा हॉस्टेल असोसिएशनचे प्रमुख नवीन मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, शहरात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी व्यवसायावर परिणाम झालेला नाही आणि विद्यार्थी कोटामध्ये येणं सुरूच आहे.
 
स्पर्धा कठीण आहे आणि कुटुंबांच्या वेदना आहेतच. आत्महत्या रोखण्यासाठी शहरात कार्यक्रम आयोजित करत आहोत. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती सुरू आहेत, मात्र आत्महत्या सुरूच आहेत. अनेक त्रासलेले विद्यार्थी शहरातील अशा हेल्पलाइन नंबरवर कॉल करतात.
 
हेल्पलाईन समुपदेशक प्रमिला साखला यांच्या म्हणण्यानुसार, "दु:खी मुलं फोनवर बोलत असताना रडू लागतात. त्यांना पाहून खूप वाईट वाटतं. त्यानंतर त्यांच्या पालकांशी आम्ही बोलतो. आम्ही त्यांना समजावून सांगतो की ते मुलांवर इतका दबाव का टाकत आहेत. आपल्या मुलानं डॉक्टर व्हावं असं त्यांना का वाटतं? तुमची मूल या जगातच नाही राहिली तर तुम्ही काय कराल?"
 
शिक्षणाचं बाजारीकरण याला जबाबदार आहे का?
शिक्षणतज्ज्ञ उर्मिल बक्षी यांनी मुलांच्या समस्यांसाठी कोटाच्या ‘बाजारीकरणाला’ जबाबदार धरलं आहे.
 
त्या म्हणातात की,"कोचिंग क्लासेसमध्ये मुलांची संख्या खूप जास्त आहे. शिक्षकांना मुलांची नावंही माहीत नाहीत. एका वर्गात 300 किंवा त्याहून अधिक मुलं बसलेली असतात. त्यांना त्यांची नावं माहीत आहेत का? कोणाला कोणाचं नाव माहीत नाही. मुल एकमेकांशी मैत्री करु शकत नाही. मूल ही एकटी राहतात. ही खूप दुःखाची गोष्ट आहे."
 
"पैसा, पैसा, किती पैसा. आपल्याला किती पैशांची गरज आहे? आम्हाला इतक्या पैशाची गरज नाही की आम्ही मुलं गमावू. आम्हाला मुलं गमावायची नाहीत. आम्हाला मुलांना काहीतरी बनवायचं आहे. आम्हाला त्यांना चांगलं माणूस बनावायचं आहे.
 
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संस्थेची फी दरवर्षी 1 ते 1.5 लाख रुपयांच्या दरम्यान असते.
 
मोशन एज्युकेशन कोचिंगचे एमडी नितीन विजय हे सहमत आहेत की वर्गाचा आकार मोठा आहे, परंतु त्यांच्या मते, "समस्या ही आहे की स्पर्धेमुळं फी खूपच कमी आहे. शिक्षकांना अधिक पगार द्यावा लागत आहे."
 
कोटामधील प्रत्येक कोचिंग सेंटर अशा शिक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते ज्यांचं विद्यार्थ्यांमध्ये फॅन फॉलोइंग आहे.
 
नितीन विजय म्हणतात, "मीडिया आम्हाला दाखवत आहे की कोटा एक माफिया आहे. हा एक व्यवसाय बनलाय. तुम्ही मला सांगा की कोटामध्ये व्यवसाय होतो. गेल्या 10 वर्षात 25 कोचिंग सेंटर बंद झाले. बुकिंगनंतर 50-50 कोटी रुपयांचा तोटा झाला.
 
नितीन विजयच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत आत्महत्येची कोणतीही घटना त्यांच्या मोशन संस्थेमध्ये घडलेली नाही आणि या समस्येला तोंड देण्यासाठी 'फन ऍक्टिविटी' उपक्रम आयोजित करणं, अभ्यासक्रम लहान ठेवणं, समुपदेशन करणं, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवणं यासारखी पावलं उचलण्यात आली आहेत.
 
विद्यार्थ्यांना तडजोड करावी लागते
कोटामध्ये अनेकांनी आपली जीवन यात्रा संपवली, लोक दु:खी आहेत, पण स्वप्न बघणं थांबलेलं नाही.
 
इथे महिन्याला 20-25 हजार रुपये भाड्यानं घरं मिळतं, तिथं उच्च वर्गातील विद्यार्थी राहतात, परंतु ही घरं प्रत्येकाच्या आवाक्यात नाहीत.
 
शहरातील विज्ञान नगरमधील एका अरुंद, अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये पायऱ्या चढून एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अर्णव अनुरागच्या खोलीत पोहोचले.
 
बिहारमधील अर्णव याच डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे. त्याचे वडील शिक्षक आहेत. ही खोली पुढील अनेक महिने त्याचं घर असणार आहे. अर्णवची वार्षिक कोचिंग फी 1 लाख वीस हजार रुपये असून मासिक खर्च 12 ते 13 हजार रुपये आहे.
 
या खोलीचं तो साडेआठ हजार रुपये भाडे देतो.
 
खोली एखाद्या बॅचलरच्या खोलीसारखी आहे, ओल आलेलं कपाट, बेडवर पुस्तकांचा ढीग, टेबलवर लॅपटॉपसह इंडक्शन हिटर शेअर करण्याची जागा, मीठाचा डबा आणि ग्लास, भिंतीला चिकटवलेले पेरियॉडिक टेबल. घामापासून बचाव करण्यासाठी कोपऱ्यात ठेवलेला कूलर आणि बरेच काही.
 
तो म्हणतो, "(खोलीत) गुदमरल्यासारखे वाटतं, पण मला इथं खूप कष्ट करावे लागतील. आता गुदमरल्याची स्थिती आहे खरी पण, जेव्हा निकाल येतील, माझी निवड होईल आणि मी इथं पुन्हा येईन तेव्हा मी म्हणेन की हीच ती खोली होती. इथेच मी अभ्यास केला होता. आणि या आठवणी ऐक्यून बरं वाटेल.”
 
कोटामध्ये राहणारे बरेच विद्यार्थी कोटाच्या हवामानाशी जुळवून घेतात आणि हे प्रत्येकासोबत घडत असं नाही.
 
तुमच्या मुलांना समजून घ्या
आम्ही कोटामध्ये होतो तेव्हा आम्हाला बातमी मिळाली की तिथल्या वसतिगृहात राहणाऱ्या आणखी एका मुलीनं आत्महत्या केली आहे. वसतिगृहातील सर्वांनाच धक्का बसला. केअरटेकर म्हणाला, ती आमच्या मुलीसारखी होती.
 
या विद्यार्थींनीचे वडील कोटाला जात असताना आम्ही त्यांच्याशी फोनवर बोललो.
 
ते म्हणाले की , "मुलीनं कोटा येथील आत्महत्यांचा उल्लेख केला होता, त्यावर आम्ही म्हणालो की, बेटा, या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नको... आम्हाला दोन मुली आहेत, एक आम्हाला सोडून गेली."
 
राजस्थान पोलिसांच्या कोटा स्टुडंट सेलचे प्रभारी चंद्रशील म्हणाले की, आत्महत्या रोखण्यासाठी त्यांची टीम सतत वसतिगृहांना भेटी देते आणि कोणत्याही विद्यार्थ्याच्या वागण्यात काही फरक किंवा बदल आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आम्ही वसतिगृहातील वॉर्डन आणि स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलतो.
 
विद्यार्थ्यांचा एकटेपणा दूर व्हावा आणि त्यांना घरचं जेवण आणि घरच्यासारखं वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या आई इथंच त्यांच्यासोबत राहतात.
 
तज्ज्ञांच्या मते, पालकांनी आपल्या मुलांच्या मनाचा वेध घेणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्यासोबत बराच वेळ घालवणं महत्वाचं आहे जेणेकरून त्यांच्या मनात काय चाललं आहे, ते उघडपणे ही मूलं पालकांशी बोलू शकतील.