उत्तर प्रदेशात गेल्या 48 तासांत योगी सरकारमधील दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिला. स्वामी प्रसाद मौर्य आणि दारासिंह चौहान या दोघांनीही आपला राजीनामा देताना योगी सरकारवर टीका केली आहे.
सरकार शेतकरी, वंचित, शोषित आणि मागासवर्गीय घटकांची उपेक्षा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
गुरुवारी उत्तर प्रदेशात भाजपच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. शिकोहाबाद येथील भाजपचे आमदार मुकेश वर्मा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
स्वामी प्रसाद मौर्य आमचे नेता असून ते जिथे जातील तिथे आम्ही जाणार असं त्यांनी राजीनामा दिल्यावर सांगितलं.
मीडिया, सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात भाजप सोडून जाणार असलेल्या इतर काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत.
शाहजपूर येथील तिलहरचे आमदार रोशनलाल वर्मा, बिल्हौरचे आमदार भगवती प्रसाद आणि तिंदवारीचे आमदार ब्रजेश प्रजापती यांनीही राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. दलित, मागासवर्गीय आणि वंचितांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आगामी काही दिवसांत 'भाजपचे अनेक आमदार आणि मंत्री पक्ष सोडणार असून समाजवादी पार्टीत प्रवेश करणार आहेत' अशी माहिती विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे सूत्र सोशल मीडिया आणि पत्रकारांना देत आहेत.
सपाचे प्रवक्ते अब्दुल हफीस गांधी सांगतात, "भाजप सोडण्याची इच्छा असलेले अनेक नेते समाजवादी पार्टीच्या संपर्कात आहेत. आम्ही या सर्वांचं स्वागत करत आहोत. येत्या काही दिवसांत भाजप सोडलेल्या अनेकांची नाव समाजवादी पार्टीशी जोडली जातील."
उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण तापलेलं असताना आणि वेगवेगळे अंदाज बांधले जात असताना भाजपमध्ये राजीनामा देण्याचे सत्र असंच सुरू राहणार का? आणि भारतीय जनता पार्टीत यामुळे चिंतेत आहे का? असेही प्रश्न उपस्थित होतात.
भाजपमधून राजीनामा देणारे स्वामी प्रसाद मौर्य एक मातब्बर राजकीय नेते आहेत.
2017 निवडणुकीआधी त्यांनी बसपामधून राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि मंत्री बनले. ते यादवेतर ओबीसी मतांचे मोठे नेते मानले जाता
मौर्य यांची समजूत काढली जाईल असे संकेत भाजपने दिले आहेत. परंतु त्यांनी बसपा सोडल्यानंतर मायावती म्हणाल्या होत्या की, पक्ष सोडून त्यांनी पक्षावर उपकार केले आहेत.
भाजपात प्रवेश करताना स्वामी प्रसाद मौर्य आपल्यासोबत अनेकांना घेऊन आले होते. आता पक्ष सोडतानाही ते अनेकांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतील असा अंदाज आहे.
स्वामी प्रसाद मौर्य आणि इतर नेत्यांच्या राजीनाम्यातून हे संकेत मिळतात की, जे मागासवर्गीय आणि वंचितांचे लोकप्रतिनिधीत्व करतात त्यांच्या लक्षात येऊ लागलं की त्यांच्या मतदारांकडे लक्ष दिलं जात नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात.
भाजपामध्ये राजकीय भूकंप?
ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान सांगतात, "मौर्य आणि इतर नेते ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यावरून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे भाजप एक अप्पर कास्ट (सवर्ण वर्ग) पक्ष आहे हे त्यांच्या लक्षात आलं आहे. विशेषत: योगी आदित्यानाथ यांनी गेल्या पाच वर्षांत ज्यापद्धतीने ठाकूर वर्गाला प्रधान्य दिलं आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीयांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे नेते पक्ष सोडत आहेत. विशेषत: ओबीसी नेत्यांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. ते भाजप आणि योगी आदित्यनाथ यांना सोडून पळून जात आहेत. भाजपचे कम्युनल कार्ड अपयशी ठरत असल्याचं यावरून दिसतं
भाजपचे नेते पक्षात असल्याचे वृत्त पक्षाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी फेटाळले. ते म्हणाले, "भाजपमध्ये अशी कोणतीही चर्चा नाही. बुधवारी (12 जानेवारी) दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
नरेश सैनी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले तर समाजवादी पार्टीतून मुलायमसिंह यादव यांचे मित्र हरीओम यादव हेही पक्षात आले आहेत. यादव हे सिरसांगज फिरोजाबादचे आमदार आहेत.
सपाच्या बालेकिल्ल्यातील आमदारही भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे की भाजपमध्ये नेते नाराज आहेत."
भाजपमधून नेते सोडून जाण्याच्या तुलनेत पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक आहे असंही भाजपचं म्हणणं आहे.
त्रिपाठी सांगतात, "एका महिन्यात भाजपमध्ये काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीतून नेत्यांनी प्रवेश केला आहे. जनाधार असलेले आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते पक्षात येत आहेत. आमच्या पक्षाच्या समितीकडे आणखी अनेक अशा नेत्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. आमची समीक्षा सुरू आहे. जनाधार असलेल्या नेत्यांना आम्ही पक्षात घेत आहोत."
भाजपमधून बाहेर पडत असलेले नेते समाजवादी पार्टीत प्रवेश करत आहेत. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव त्यांचं स्वागत करत आहेत. पक्षाचे प्रवक्ते अब्दुल हफीज गांधी सांगतात, "जे नेते किंवा व्यक्ती सामाजिक न्यायाची लढाई लढत आहेत त्यांना पक्षाचा भाग बनवण्याचा प्रयत्न आहे. भाजपमधून ज्यांना पक्षात यायचे आहे त्यांचे स्वागत आहे. यामुळे सामाजिक न्यायाची लढाई आणखी मजबूत बनले."
ओबीसी नेते नाराज?
भारतात जातीच्या आधारावर जनगणना केली गेली नाही परंतु असे मानले जाते की उत्तर प्रदेशमध्ये इतर मागासवर्गीय लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.
2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप सत्तेवर येण्यामागे इतर मागासवर्गीयांचा पाठिंबा आणि 2017 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपच्या विजयामागचे प्रमुख कारण मानले गले.
अशा परिस्थितीत स्वामी प्रसाद मौर्य यांच्या बंडखोरीनंतर भाजपला ओबीसी मतदार प्रवर्गात फटका बसू शकतो. ओबीसी मतदारांनासोबत ठेवणारा चेहरा भाजपकडे आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो.
शरत प्रधान सांगतात, "भाजपकडे नरेंद्र मोदी हा एकच चेहरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली ओबीसींना भाजपकडे खेचले होते. मोठ्या संख्येने ओबीसी भाजपमध्ये सामील झाले होते. पण आता योगी सरकारच्या वर्तनुकीमुळे ओबीसींची कमतरता दिसते. यावर प्रभावी उत्तर शोधण्यासाठी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी फारसा वेळ उरलेला नाही."
भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी सांगतात, राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य मागासवर्गीयांचे सर्वात मोठे नेते आहेत.
ते म्हणाले, "आता यूपीमध्ये जातीचे किंवा व्होटबँकेचे राजकारण संपले आहे. भाजपने विकास हा महत्त्वाचा मुद्दा बनवला आहे. आज कोणीही कोणत्याही जातीचा ठेकेदार नाही. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या जाण्याने झालेल्या नुकसानाचा प्रश्न आहे, भाजपकडे आहे. आधीच मौर्य, शाक्य, सैनी, कुशवाह समाजातील नेतृत्व पुरेशा प्रमाणात आहे. युपीमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे निर्विवादपणे राज्यातील मागासवर्गीयांचे सर्वात मोठे नेते आहेत. पक्षात मागासवर्गीय नेत्यांची कमतरता आहे या दाव्यांमध्ये तथ्य नाही."
भारतीय जनता पक्षानेही पक्षातील कोणत्याही विशिष्ट वर्गामध्ये नाराजी असल्याचे नाकारले. पक्षाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणतात की, तेच लोक पक्ष सोडत आहेत ज्यांना पक्षात आपले भविष्य दिसत नाही.
त्रिपाठी म्हणतात, "ज्या नेत्यांना असे वाटते की पक्षाच्या सर्वेक्षणात आपला अहवाल नकारात्मक आहे किंवा त्यांना पक्षासोबत लढणे कठीण जाईल किंवा पक्षात त्यांचे भविष्य अंधःकारमय आहे, ते पक्ष सोडत आहेत. परंतु आम्ही असे म्हणू शकतो की आजवर भाजप सोडून गेलेल्या सर्व नेत्यांचे राजकीय भवितव्य अंधकारमय झाले आहे."
स्वामी प्रसाद मौर्य यांनी दावा केला आहे की, ते एकटेच नाही. तर त्यांच्यासोबत अनेक जण पक्ष सोडत आहेत.
हा दावा राकेश त्रिपाठी यांनी फेटाळला. ते म्हणाले, "स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबतच भाजपमध्ये दाखल झालेले त्यांचे निकटवर्तीय आमदार अनिल मौर्य यांनीही आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. धर्मसिंग सैनी यांच्याबाबतही अफवा पसरवण्यात आल्या होत्या. पण त्यांनीही पक्ष स्पष्ट केलं की जाणार नाहीत. यावरून असं दिसतं की स्वामी प्रसाद मौर्य यांची पकड कमकुवत झाली आहे."
भाजप मजबूत होतोय तर नेते पक्ष सोडून का जात आहेत?
गेल्या काही वर्षांतील रेकॉर्ड पाहिल्यास, विशेषत: 2014 नंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. भाजपचा राजकीय पायाही वाढला आहे.
राज्यात आणि केंद्रात पक्षाची सत्ता आहे आणि सदस्यांच्या दृष्टीने पाहिले तर भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष सध्या आपल्या राजकीय इतिहासात सर्वात मजबूत स्थितीत आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकांबाबतही विश्लेषकांचे मत आहे की भाजप मजबूत स्थितीत आहे.
पक्षाची संघटनात्मक बांधणी, साधनसंपत्ती आणि प्रभाव पाहिल्यास राज्यात निवडणूक लढवणाऱ्या इतर पक्षांच्या तुलनेत भाजप मजबूत असल्याचे दिसून येते. अशा स्थितीतही मंत्री, आमदार पक्ष सोडत असतील तर पक्षांतर्गत सर्व काही ठीक नाही आणि आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती कमकुवत होऊ शकते, याची जाणीव त्यांना झाली आहे, असे का मानू नये?
या प्रश्नावर उत्तर देताना राकेश त्रिपाठी म्हणाले, "उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा आलेख सातत्याने वाढत आहे. 2017 मध्ये पक्षाचे 1 कोटी 87 लाख सदस्य होते, आता आमचे 3 कोटी 80 लाख सदस्य आहेत. आमच्याकडे पूर्वीपेक्षा जास्त सदस्य आहेत, आम्ही पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की भारतीय जनता पक्ष गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकणार आहे."
ज्यांना तिकीट मिळण्याबाबत साशंकता आहे असेच नेते पक्ष सोडून जात आहेत असं भाजपचं म्हणणं आहे.
राकेश त्रिपाठी सांगतात, "भाजपमध्ये लोकशाही प्रक्रिया आहे. आमदारांचा फिडबॅक घेतला जातो आणि नंतरच त्यांना तिकीट दिलं जातं. पक्ष आमदारांचे सर्वेक्षण करते. गेल्या निवडणुकीत ज्या जागा पक्षाने गमावल्या त्या जागांवर अधिक सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय पक्षात होणारी ही स्वाभिक प्रक्रिया आहे. जे नेते सोडून जात आहेत त्यांची स्थिती पक्षात मजबूत नाही. म्हणून ते इतरत्र संधी शोधत आहेत. पण यामुळे त्याचं भलं होणार नाही. भाजपमध्ये ज्यांचे कल्याण होऊ शकले नाही त्यांचे इतर कुठेही कसे कल्याण होऊ शकते?"
पक्ष सोडणाऱ्यांना भाजपमध्ये त्यांचे भवितव्य सुरक्षित दिसत नाही आणि ते केवळ त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी पक्ष सोडत आहेत, असे मानता येईल का? की ते खरेच आपल्या मतदारांचा विचार करत आहेत?
शरत प्रधान म्हणतात, "आता राजकारण बदलले आहे. ते दिवस गेले जेव्हा नेते राजकीय विचारसरणीनुसार निर्णय घ्यायचे आणि त्यासाठी त्यासाठी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावायची. आता नेते आपले राजकीय हित आधी पाहतात. खरं तर नेत्यांना जेव्हा जेव्हा लक्षात येतं की राजकीय करिअरला धोका आहे ते बाजू बदलतात."
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर प्रश्न?
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपसोबतच आपली वेगळी आणि समान प्रतिमा निर्माण केली आहे. यूपी सरकारला भाजप सरकारपेक्षा योगी सरकार म्हटले जाते. अशा स्थितीत पक्ष सोडणारे नेते विशेषत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज असू शकतात का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
शरत प्रधान म्हणतात, "नाराजी विशेषत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आहे यात शंका नाही. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळावर नजर टाकली तर, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी स्वत:ला सर्वोच्च ठेवण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यूपीमध्ये योगीच सर्वस्व आहेत असे संकेत आणि संदेश देण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला जात आहे. लखनौच्या राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की योगी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सहज भेटत नाहीत. अनेक मंत्री अनऔपचारिकपणे तक्रार करतात की योगी आदित्यनाथ यांची भेट घेणे सोपे नाही."
याचा योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेवरही परिणाम होईल का?
शरत प्रधान सांगतात , "योगी आदित्यनाथ यांनी आपली एक मोठी प्रतिमा निर्माण केली असेल, पण सत्य हे आहे की ते केवळ भाजपचा एक भाग असल्याने मुख्यमंत्री होऊ शकले आहेत. योगी आदित्यनाथ यांना वाटत असेल की ते पक्षापेक्षा मोठे आहेत तर ही त्यांची अपरिपक्व विचारसरणी आहे. पक्ष सोडून जाणारे नेते योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज असले तरी भाजपला याचा फटका बसला आहे."
'मौर्य यांनी पुनर्विचार करावा'
स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांना आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना परत यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे, असे भाजपचे मत आहे.
त्रिपाठी म्हणाले, "स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्री म्हणून राज्यात चांगले काम केले आहे, असा भाजपचा विश्वास आहे. पक्षाबाहेर गेल्यावरही ते याच कामाविषय बोलतात. त्यांना पक्षाशी बोलायचे असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी पक्षात राहावं अशी आमची इच्छा आहे. पण त्यांनी वेगळा मार्ग निवडला असेल तर ते स्वतंत्र आहेत."
ते पुढे म्हणाले, "भाजप हा कोणत्याही एका कुटुंबाचा पक्ष नाही, तर पक्ष हाच परिवार आहे. कुटुंबात काही नाराजी किंवा फूट असेल, तर पक्षासोबत संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. तसे असल्यास, पक्षांतर्गत बसून त्याचे निराकरण केले पाहिजे. असे असतानाही जर कोणाची नाराजी एवढी असेल की त्यांना पक्ष सोडायचा असेल तर ते स्वत:चा मार्ग निवडण्यास मोकळे आहेत. कोणालाही बंदिस्त ठेवता येत नाही. काही अडचण असेल तर पक्षात संवाद व्हायला हवा."
स्वामी प्रसाद मौर्य, इतर मंत्री आणि आमदारांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. भाजप डॅमेज कंट्रोलमध्ये व्यग्र आहे. दुसरीकडे भाजप कमकुवत होत असल्याचे दाखवण्यासाठी समाजवादी पक्ष या परिस्थितीचा फायदा घेत आहे.
समोर दिसणाऱ्या घटनांपेक्षा पडद्यामागे बऱ्यात गोष्टी सुरू आहेत.
शरत प्रधान सांगतात, "गेल्या दोन दिवसांच्या घडामोडींमुळे निवडणूक रंजक झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री बाहेर पडल्याने भाजप निवडणुकीत कमकुवत स्थितीत असल्याचे संकेत मिळातात. काहीही असो पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटना महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होत सतो. नुकसान कसे भरून काढायचे हे आव्हान भाजपसमोर आहे. याची भरपाई भाजप करू शकेल का? हा प्रश्न आहे."