रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मे 2023 (16:51 IST)

वानखेडेंनी शाहरुखकडे मागितली होती 25 कोटींची खंडणी, सीबीआयचा आरोप

sameer vankhade
एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींची मागणी केली होती. त्यानंतर 18 कोटींवर हा सौदा ठरला. 50 लाखांची टोकन रक्कमही त्यांनी एका मध्यस्थाच्या माध्यमातून स्विकारल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
 
ऑक्टोबर 2021 मध्ये कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापेमारी केली होती. या छापेमारीत ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली आर्यन खानला अटक करण्यात आली होती. वानखेडे यांनी आर्यनची सुटका करण्यासाठी शाहरूख खानकडे तब्बल 25 कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणात वानखेडे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने समीर वानखेडे आणि इतर दोन अधिकाऱ्यांशी संबंधित देशभरातील 29 ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
 
काय होतं प्रकरण?
2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. यावेळी 5 ग्रॅम मेफेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळय़ा आणि 1 लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. याप्रकरणात क्रूझवरून आर्यन खानसह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्यासह 20 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आर्यन खान काही दिवस तुरुंगात होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट मिळवले होते. अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्जबाबत चर्चा झाल्याचा एनसीबीचा आरोप होता. त्यानंतर आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor