गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (08:55 IST)

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, उदयपूरमध्ये तणाव

राजस्थानमध्ये एका युवकाची गळा कापून हत्या केल्याची घटना झाल्यावर वातावरण तणावपूर्ण झालं आहे.
ANIने दिलेल्या बातमीनुसार या घटनेनंतर उदयपूरमध्ये काही भागात जाळपोळ आणि निदर्शनं सुरू झाली आहेत.
 
उदयपूरचे जिल्हाधिकारी ताराचंद मीणा यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सर्व पक्षांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे.ते ट्विटरवर लिहितात, "उदयपूरमध्ये झालेल्या निर्घृण हत्येचा मी निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. मी सर्व पक्षांना शांततेचं आवाहन करत आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की या घटनेचा व्हीडिओ शेअर करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये. व्हीडिओ शेअर केल्यास समाजात घृणा पसरवणाऱ्यांचा उद्देश साध्य होईल."
 
ANI ने दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या युवकाने गेल्या काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला पाठिंबा देणारी पोस्ट टाकली होती. बीबीसीने या वृत्ताची पुष्टी केलेली नाही.
 
या संपूर्ण घटनेविषयी बोलताना उदयपूरचे पोलीस अधीक्षक म्हणाले, "ही अतिशय निर्घृण हत्या आहे आणि या हत्येची सखोल चौकशी करण्यात येईल. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची टीम पाठवण्यात आली आहे."
 
तर उदयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला संपूर्ण मदत करण्याची ग्वाही दिली आहे.
 
उदयपूर पोलिसांचं काय मत आहे?
नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून हत्या झाली अशी चर्चा होत आहे. त्यावर उत्तर देताना पोलीस अधीक्षक म्हणाले, "आम्ही सगळे रेकॉर्ड तपासत आहोत. आम्ही सध्या घटनास्थळाचा आढावा घेत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांशीसुद्धा चर्चा करत आहोत."
 
एक व्हीडिओही यासंदर्भात व्हायरल होत आहे. त्यात मुस्लिम व्यक्ती पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यासाठी उचकवत असल्याचं दिसत आहे.
 
मृतक कोण आहे?
उदयपूरच्या धानमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कन्हैया लाल तेली टेलरिंगचं दुकान चालवायचा.
मंगळवारी दुपारी त्याच्या दुकानात कपडे शिवण्याच्या बहाण्याने लोक पोहोचले आणि त्याला दुकानातून बाहेर काढलं आणि तलवारीने त्याचा गळा कापला.
 
कन्हैया लालचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हीडिओ समोर आला आहे.
घटनेनंतर हिंदू संघटनांमध्ये रोष आहे आणि त्यांनी शहरातले बाजार बंद केले आहेत. तसंच अनिश्चतिकालीन बंद पुकारण्याचं आवाहन केलं आहे.
 
आरोपींना अटक
या हत्याकांडातील दोन्ही आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे. या खटल्यात आरोप निश्चित केले जातील आणि न्यायालयाकडून कडक शिक्षा देण्यात येईल. मी पुन्हा एकदा सगळ्यांना शांततेचं आवाहन करत आहे.