शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (13:17 IST)

तिरुपतीची रुसून आलेली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा

गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले. विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला, बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णूजवळ जावून बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला. हे ऐकून क्रोधीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपचर्या सुरु केली. ब्रह्मदेवानी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले. या स्थानाविषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे.
 
पुरातनकाळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने बह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यू समयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले. कोल्हासूराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता, ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूवेर्कडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीरक्षेत्री जा. माझा राग गेला, पण मी येणार नाही. असं तिने सांगितलं. व तिने तेथेच वास केला.
 
तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते. तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही बघण्यात येतं. बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत, जो वर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, अशी भाविकांची मान्यता आहे. तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्याची ही कथा आहे.
 
एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले. त्यावेळी विष्णू शेषशाई असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होती. भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही ह्याचा राग येऊन महर्षी भृगु ह्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्ताप्रहार केला. भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी 
 
त्यांची क्षमा मागितली, आणि भृगुंचे पाय चेपण्यास सुरुवात केली. भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला. ह्या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली. देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून, आज ही कोल्हापूर मधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मींचा वास आहे अशी आख्यायिका आहे.
 
आणखी एका आख्यायिकेनुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थान आहे असे म्हटले जाते. शक्ती संतुलित रहावी यासाठी शिवही तेथे असल्याचा समज आहे. पण शिवाच्या देवस्थानमध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे.