बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. न्यूजमेकर्स
Written By अभिनय कुलकर्णी|

नशीबवान अशोक चव्हाण

MH News
MHNEWS
अशोकरावांना 'मुख्यमंत्रिपदाची' लॉटरी अर्थातच अचानकपणे लागली असली तरी विधानसभा निवडणुकांच्या रूपाने त्यांना 'टिडीएस' भरावा लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा आनंद मानावा की 'टिडीएस'चे दुःख करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यास त्याचे खापर आपल्याच भाळी फुटून पुढच्या राजकीय कारकिर्दीचे तीनतेरा वाजण्याची नौबत या शंकरराव पुत्राच्या नशिबी नाही आली म्हणजे मिळवली. बाकी विलासरावांनी जाता जाता नारायण राणे आणि अशोकरावांचाही छान 'गेम' केला.

आपल्या आठ महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात अशोक चव्हाणांनी फार भरीव असं काही केलं नसलं तरी योगायोगाने त्यांच्या कार्यकाळातच वांद्रे- वरळी सी लिंक पूर्ण झाला नि त्यात मिरविण्याची संधी त्यांनी साधून घेतली. याशिवाय फार काही महत्त्वाचं त्यांच्या कारकिर्दीबद्दल सांगता येत नाही. मराठवाड्याच्या औरंगाबाद विभागाचे विभाजन करून मुख्यालय त्यांनी विलासरावांच्या लातूरहून आपल्या नांदेडला पळवून नेले. पण आता तोही प्रश्न न्यायालात गेला आहे. बाकी राज्यात महागाई, लोडशेडींग आणि इतर प्रश्न त्यांच्याही काळात कायमच राहिले. अर्थात, त्यांच्यावर भ्रष्टाचारासह कोणत्या आरोपाचा डाग मात्र त्यांच्या कारकिर्दीवर लागला नाही. त्यांची एकूण कारकिर्दच तशी स्वच्छ म्हणावी अशी आहे.

मास्तर म्हणून प्रख्यात असणार्‍या शंकरराव चव्हाणांचे अशोक हे पुत्र. वडिलांचाच वारसा पुढे चालू ठेवत अशोकरावांनी राजकारणात प्रवेश केला. नांदेड मतदारसंघातून 1987 मध्ये पहिल्याच निवडणुकीत ते खासदार झाले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 1991 ते 95 दरम्यानच्या विधानसभा निवडणूक जिंकत त्यांनी आपली घराण्याची परंपरा कायम ठेवली. अर्थात राजकीय डावपेच खेळण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याने त्यांना राजकीय नेता म्हणून त्यांची ख्याती झाली नाही. मात्र, मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी तितक्याच निष्ठेने पार पाडली. आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे सतत काहीना काही करण्याची त्यांची धडपड राहिल्याने त्यांनी स्वतःच्या खात्यात काही ना काही टप्पा गाठला, असे म्हणणे उचित ठरेल.

अशोक चव्हाण यांनी एमबीए आहेत. उच्चशिक्षण घेऊनही त्यांनी राजकारण प्रवेश केला. या अर्थाने त्यांच्यारूपाने राज्याला स्वच्छ चारित्र्याचा आणि उच्चशिक्षित नेता मिळाला. परिवहन मंत्री, सांस्कृतिक आणि उद्योग मंत्री म्हणून काम करताना त्यांनी निश्चितच काही बदल घडविले. एसटीचे उत्नन्न वाढविण्यासाठी नवनवीन योजना, लघुउद्योगासाठी स्वतंत्र झोनची संकल्पना, आय.टी क्षेत्राला प्राधान्य, ज्येष्ठ कलाकारांना निवृत्तीवेतन, व्यावसायिक नाटकांना अनुदान आदी नव्या संकल्पना त्यांनी आपल्या काळात यशस्वी करून दाखविल्या.

मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या नेतृत्वासाठी रंगलेल्या नाट्यात पक्षातील अनेक दिग्गजांनी शक्तीप्रदर्शन केले पण, अनाहूतपणे अशोक चव्हाण यांची नाव पुढे आले आणि त्यावर शिक्कामोर्तबही झाले. गांधी घराण्याच्या मर्जीमुळे त्यांना ही संधी मिळाल्याची टिप्पणी केला जात असली तरी यापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांची प्रांजळ इमेज आणि त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांची निवड झाली. पण मुळातच कामासाठी वेळच कमी लाभल्याने अशोकराव करणार तरी काय?