रिक्षात विसरलेली अडिच तोळे सोने व रोकड असलेली बॅग महिलेला केली परत
अडिच तोळे सोने,पाच हजार रुपये व कपड्यांसहीत रिक्षात विसरलेली बॅग महिलेला एका प्रामाणिक रिक्षा चालकाने परत मिळवून दिली आहे. बंडगार्डन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षा चालकास संपर्क करुन महिलेला तिची बॅग सर्व ऐवजासहित परत मिळवून दिली आहे.
लिलाबाई चांगदेव भिडे (रा. 45,रा. वाघेश्वरनगर,वाघोली, पुणे )असे या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलाबाई भिडे यांची अडिच तोळे सोने, पाच हजार रुपये व कपड्यांनी भरलेली बॅग पुणे स्टेशन येथील एका रिक्षात विसरली. याबाबत त्यांनी गुरुवारी (दि.08) बंडगार्डन पोलीस ठाण्यात माहिती दिली.
यावेळी ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार व पोलीस अंमलदार प्रकाश सांवत यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षा नंबर आणि रिक्षा मालकाची माहिती काढून त्याला संपर्क केला. त्यावर रिक्षा मालक ईस्माईल सय्यद यांनी बॅग रिक्षात विसरली असून, मी ती घेऊन पोलीस ठाण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच तात्काळ पोलीस ठाण्यात येत लिलाबाई यांना त्यांचा ऐवज असलेली बॅग सूपूर्द करण्यात आली.
रिक्षा चालक सय्यद यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार व पोलीस अंमलदार प्रकाश सांवत, अमित बधे यांनी दोन तासांत लिलाबाई चांगदेव भिडे यांची किमंती ऐवज असलेली बॅग ताब्यात दिली.