पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवी शाळा तुर्तास बंद
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटचा धोका लक्षात घेऊन पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवी शाळा तुर्तास बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय परिस्थीती पाहून 15 डिसेंबर नंतर घेण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेच्या या नवीन आदेशामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
कोरोनाचा प्रदुर्भाव आटोक्यात आल्याने राज्य शासनाकडून निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्य शासनाने 1 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचे जाहीर केले आहे. याबाबत मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार पुणे महापालिका प्रशासनाने शाळा सुरु करण्याबाबत तयारी पूर्ण केली होती.
दरम्यान, कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिंएंटच्या वाढत्या धोक्यामुळे मंगळवारी महापालिका अधिकारी व पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा 1 डिसेंबर रोजी सुरु न करता परिस्थिती पाहुन 15 डिसेंबरनंतर याबाबत निर्णय घेण्यावर चर्चा झाली. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी नवीन आदेश काढले आहेत.