गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (08:07 IST)

कोरोना प्रतिबंधक लस संपली! पिंपरी चिंचवड-देहूरोड-मावळमध्ये सर्व लसीकरण केंद्रे बंद

कोरोना प्रतिबंधक लस संपल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.
 
महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. महापालिकेची 59 आणि खासगी 28 अशी 87 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. या 87 लसीकरण केंद्रावर शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाते. तथापी, लसीचा साठा उपलब्ध नसल्याने शुक्रवारी (दि.9) एप्रिल रोजी सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
 
महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या 59 लसीकरण केंद्रामार्फत सुमारे 1 लाख 80 हजार 92 व्यक्तींना लस देण्यात आले आहे. तर, खासगी 28 लसीकरण केंद्रामार्फत 50 हजार 777 व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरातील एकुण 2 लाख 30 हजार 869 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.
 
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीचा साठा प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. साठा उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण केंद्र नियमीत वेळेत सुरू करण्यात येणार आहेत.
 
मावळमध्येही लसीकरण बंद
 
दरम्यान गुरुवारी covishield लस जिल्हास्तरावरून उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे (शुक्रवारी दि. 9 एप्रिल) रोजी लसीकरण होणार नाही. लस उपलब्ध झाल्यास सर्वांना कळविण्यात येईल, अशी माहिती मावळचे कोविड समन्वयक डॉ. गुणेश बुगडे यांनी दिली.
 
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार देहूरोड कॅंटोन्मेंटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी लसीचा साठा संपल्याने लसीकरण बंद करण्यात आले. उद्याही लसीकरण होणार नाही. लसीचा साठा प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. साठा उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण केंद्र नियमीत वेळेत सुरू करण्यात येईल, अशी माहिती कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.