कुख्यात गुंड छोटा राजनची पुतणी गजाआड, मागितली होती 50 लाखाची खंडणी
गँगस्टर छोटा राजनची पुतणी असल्याची सांगून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मागील वर्षभरापासून फरार असलेली छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय 36, रा. वानवडी) हिला पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रियदर्शनी निकाळजे हिने मार्च 2020 मध्ये एका व्यक्तीला 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मी एका राजकिय पक्षाची जिल्हा अध्यक्ष आहे. तसेच, स्वतः गँगस्टर छोटा राजनची पुतणी असून, आमचा डीएनए देखील एक आहे. जीव प्यारा असेल तर 50 लाख रुपये दे, असे म्हणत धमकावले होते.
याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सापळा रचून 25 लाखांची खंडणी स्वीकारताना धीरज साबळे याला रंगेहात पकडले होते. तर चौकशीअंती मंदार वाईकर याला अटक केली होती. यातील मुख्य आरोपी प्रियदर्शनी मात्र पसार झाली होती.
दरम्यान, खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी सचिन अहिवळे यांना प्रियदर्शनी ही आज वानवडी परिसरात आली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिला सापळा रचून अटक केली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदनाखाली वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंझे, सुरेंद्र जगदाळे, विजय गुरव, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, संपत अवचरे, भूषण शेलार, मोहन येलपल्ले, राहुल उत्तरकर, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, आशा काळेकर याच्या पथकाने केली आहे.