मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (15:13 IST)

ड्रीम 11 मध्ये पोलीस उपनिरीक्षकाने जिंकले 1.5 कोटी, पण आता कारवाईची टांगती तलवार?

पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम इलेव्हन ॲप वर दीड कोटी रुपये जिंकले आहेत.
 
बांगलादेश आणि इंग्लंड क्रिकेट सामन्याच्या वेळी झेंडे ड्रीम 11 ॲपच्या माध्यमातून खेळले. त्यात त्यांना दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
 
सोमनाथ झेंडे हे मागील दीड महिन्यापासून ड्रीम 11 वर खेळत आहेत.
 
भाजपा प्रवक्ते अमोल थोरात यांनी आता झेंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
एकीकडे तरुण पिढीला वाचवण्यासाठी शासन आणि विविध घटकांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र पोलिसांच्या या कृतीमुळे जुगाराला आमंत्रण मिळेल, असा त्यांचा आरोप आहे.
 
पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ऑनड्यूटी असताना कामात कसूर करून, हलगर्जीपणा करून ड्रीम 11 या मोबाइल ॲप्सवर ऑनलाइन जुगार खेळला. त्यामुळे त्यांना काही रक्कम मिळाली.
 
आपण मोठी कामगिरी केली असल्याच्या आविर्भावात पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी सोशल मीडियावर स्वत:चे खाकी गणवेशातील फोटो व व्हिडिओ व्हायरल केले आहेत. त्यामुळे राज्याच्या पोलिस दलाबाबत चुकीचा संदेश दिला गेला असंही या तक्रारीत पुढे म्हटलं आहे.
 
सोमनाथ झेंडे काय म्हणाले?
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
 
ते म्हणाले, “मी गेल्या महिन्याभरापासून ड्रीम 11 मध्ये पैसे लावायला सुरुवात केली. माझे अनेक मित्र यात पैसे लावायचे. बांग्लादेश आणि इंग्लंडच्या टीमवर पैसे लावले. त्यात मला दीड कोटी रुपये लागले. मला इतका आनंद झाला.
 
मी लगेच माझ्या पत्नीला फोन केला. तिलाही आनंद झाला. आता मिळालेल्या पैशातून मी घराचं कर्ज फेडणार आहे आणि मुलांच्या नावावर फिक्स डिपॉझिट करणार आहे."
 
ड्युटीच्या वेळी ऑनलाईन खेळ करणं हे कायद्याच्याविरुद्ध आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र आपण हे सगळं फावल्या वेळात करत असल्याचं झेंडे यांनी सांगितलं.
 
पुणे मिररने ही बातमी दिली आहे.
 
बीबीसी मराठीनेही यासंबंधी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
 
ड्रीम 11 कंपनी काय आहे?
ड्रीम11 हा ऑनलाईन फॅन्टसी स्पोर्ट्स कंपनी आहे. याद्वारे चाहत्यांना ऑनलाईन क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल खेळता येतं.
 
हर्ष जैन आणि भाविश सेठ या भारतीय उद्योजकांनी 2008 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. 2018 मध्ये ड्रीम11 चे चार दशलक्ष युझर्स होते. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला महेंद्रसिंग धोनी ड्रीम11 कंपनीचा सदिच्छादूत (ब्रँड अम्बॅसिडर) आहे.
 
ड्रीम11 हा फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म असून, यामध्ये ग्राहकांना क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, हॉकी, व्हॉलीबॉल खेळता येतं. ग्राहकांना व्हर्च्युअल टीम तयार करता येते.
 
सर्वाधिक गुण पटकावणाऱ्या ग्राहकाला बक्षीस मिळतं. ड्रीम11 फँटसीमध्ये पैसे देऊन आणि विनाशुल्क असे दोन्ही स्वरुपाचे गेम्स खेळता येतात.
 
हा गेम खेळण्यासाठी ग्राहकाचं वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. ड्रीम11 गेम खेळण्यासाठी पॅनकार्डद्वारे ग्राहकाला अकाऊंट व्हेरिफाय करावं लागतं.
 
फँटसी गेम म्हणजे काय?
स्मार्टफोन, टॅब तसंच कॉम्प्युटर या डिव्हाईसच्या माध्यमातून खेळल्या जाणाऱ्या खेळांना 'ऑनलाईन गेमिंग' म्हटलं जातं. याचे तीन मुख्य प्रकार आहेत.
 
रिअल मनी गेम्स म्हणजे ज्याद्वारे युझर पैसा मिळवू शकतात. यामध्ये विविध फँटसी गेम्सचा समावेश होतो. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी यासह अन्य खेळांचे गेम तसेच स्पर्धांसाठी फँटसी लीग खेळता येते. रमी तसंच पोकरचाही यात समावेश होतो.
 
मोबाईल कॅज्युअल गेमिंग मध्ये स्मार्टफोनवर खेळल्या जाणाऱ्या खेळांचा समावेश असतो. यामध्ये कँडी क्रश, सबवे सर्फर, टेंपलरन अशा गेम्सचा समावेश होतो.
 
इ-स्पोर्ट्समध्ये फिफा, पब्जी, काऊंटरस्ट्राईक यांचा समावेश होतो.
 
फँटसी गेम्स काय आहेत?
फँटसी गेम्सची भारतातली सुरुवात 2001 मध्ये झाली होती. ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्स या समूहाने सुपर सिलेक्टर फँटसी गेम लाँच केला होता.
 
वीस वर्षांपूर्वी ऑनलाईन साक्षरता, वेगवान इंटरनेटची उपलब्धता, ऑनलाईन बँकिंगच्या संधी सगळंच मर्यादित होतं.
 
सध्याच्या घडीला, भारतात साधारण 70 फँटसी गेम ऑपरेटिंग कंपन्या आहेत.
 
प्रत्येक फँटसी गेमचं स्वरुप थोडं वेगवेगळं असतं पण खेळण्याचा ढाचा साधारण सारखाच असतो. युझरला नाव, इमेल आणि बँक अकाऊंट डिटेल्स द्यावे लागतात. पॅन किंवा आधार कार्ड नंबर द्यावा लागतो. एनरोल करण्यासाठी नाममात्र पैसे भरावे लागतात. फँटसी गेम खेळण्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असणं बंधनकारक आहे.
 
एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचसाठी किंवा आयपीएलसारख्या लीगसाठी तुम्ही खेळू शकता. फँटसी लीगचं मर्म हे की तुम्ही त्या संबंधित मॅचपूर्वी टीम तयार करायची. म्हणजे दोन्ही संघांचा अभ्यास करून सर्वोत्तम 11 खेळाडू निवडायचे. तुम्ही तुमच्या मित्रांची, ऑफिसातल्या सहकाऱ्यांची, क्रिकेटवेड्या दोस्तांची मिळून लीग तयार करू शकता. तसंच तुम्ही अनोळखी लोकांबरोबरही खेळू शकता.
 
यात पब्लिक काँटेस्ट आणि प्रायव्हेट काँटेस्ट असे प्रकार असतात. पब्लिक काँटेस्टमध्ये तुम्ही मोठ्या स्पर्धेचा भाग होता. बाकी स्पर्धकांची संख्या लाखात असू शकते. तुम्हाला अन्य स्पर्धक कोण हे समजणंही अवघड आहे. प्रायव्हेट काँटेस्टमध्ये तुम्ही तुमच्या ठरवलेल्या लोकांबरोबर खेळू शकता.
 
मॅच होते. तुम्ही निवडलेल्या खेळाडूंना त्यांच्या मॅचमधल्या कामगिरीनुसार गुण मिळतात. शतकासाठी, पाच विकेट घेण्यासाठी, कॅचसाठी अशा प्रत्येक यशासाठी अतिरिक्त गुण युझरला मिळतात. प्रत्येक रन, प्रत्येक विकेटसाठी गुण मिळतातच.
 
त्या गुणांनुसार विजेता घोषित केला जातो. विजेत्याच्या खात्यात पैसे जमा केले जातात. एका फँटसी लीगदरम्यान अनेक फ्री तसंच पेड काँटेस्ट असतात. त्यामुळे विजेत्यांची संख्या बरीच असते.
 
फँटसी लीगमधून होणाऱ्या कमाईवर टॅक्स भरावा लागतो का?
हो. फँटसी गेम खेळून मिळणाऱ्या कमाईवर टॅक्स भरावा लागतो. ही कमाई टॅक्सच्या नियमांमध्ये उत्पनाचे अन्य स्रोत या वर्गात मोडते.
 
इन्कम टॅक्स कायद्यामधील 115BB अंतर्गत टॅक्स लागू होतो. फँटसी लीग, लॉटरी, क्रॉसवर्ड पझल, रेस, कार्ड गेम्स मधून होणारी कमाई टॅक्ससाठी पात्र ठरते.
 
फँटसी गेम खेळण्यासाठी तुम्ही किती रक्कम नोंदणी शुल्क म्हणून भरली आहे यावरून टॅक्सची रक्कम ठरत नाही. फँटसी लीगच्या माध्यमातून तुम्ही किती रक्कम जिंकलेय त्यानुसार टॅक्स कापला जातो.
 
उदाहरणार्थ- एखाद्या फँटसी गेमचे नोंदणी शुल्क 100 रुपये असेल आणि तुम्ही 10,000 रुपयांची कमाई केली तर टॅक्स 10,000 या रकमेआधारित ठरेल.
 
सट्टेबाजी आणि फँटसी गेम यांच्यात नेमका फरक कसा आहे?
आर्थिक व्यवहार या कळीच्या मुद्यावर दोन गोष्टीत फरक आहे. फँटसी गेमसाठी डिजिटल पद्धतीने व्यवहार होतो. त्याची नोंद दाखवता येऊ शकते. सट्टेबाजीत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा हिशोब नसतो. बेकायदेशीर आणि अनियंत्रित पद्धतीने व्यवहार चालतात.
 
फँटसी गेम्समध्ये आर्थिक व्यवहाराची रक्कम लहान तसंच मध्यम स्वरुपाची असते. उदाहरणार्थ-कोणताही फँटसी खेळ खेळण्यासाठी चाहत्याला रक्कम भरून खेळता येतं. सट्टेबाजीत गुंतलेली रक्कम मोठी असते.
 
फँटसी गेम्सच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांना कॉर्पोरेट टॅक्स, इन्कम टॅक्स, टीडीएस, जीएसटी याचं अधिष्ठान असतं. सट्टेबाजीदरम्यान होणारे आर्थिक व्यवहार नियमबाह्य पद्धतीने होत असल्याने सरकार तसंच कायद्याचं कार्यकक्षेत येत नाहीत.
 
फँटसी गेम्स खेळणाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विविध टप्प्यांवर ओटीपी, पासवर्ड, इमेल अशा विविध स्वरुपाच्या ऑनलाईन सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सट्टेबाजीत पैसे गुंतवलेल्या व्यक्तीच्या पैशाची शाश्वती देता येत नाही.
 
ज्या मॅचसाठी फँटसी गेमचे युझर खेळतात त्यांच्या निर्णयांनी मॅचच्या निकालावर फरक पडत नाही. सोप्या शब्दात सांगायचं तर फँटसी गेम खेळून प्रत्यक्ष मॅचमधल्या घडामोडी बदलता येत नाहीत, काही विशिष्ट गोष्टी घडवून आणता येत नाहीत तसंच नियंत्रितही करता येत नाहीत. सट्टेबाजीत याच्या अगदी उलट असतं. सट्टा लावल्यानुसार काही वेळेला मॅचचा निर्णय बदलल्याचं, खेळाडूच्या कामगिरीत बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
 
फँटसी गेमच्या वैधतेसंदर्भात देशात विविध न्यायालयांनी विविध पद्धतीने निर्णय दिले आहेत. तूर्तास पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने ड्रीम11 फँटसी लीगला वैध ठरवलं आहे. या न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नंतर सर्वोच्च न्यायायावर शिक्कामोर्तब केलं. दुसरीकडे सट्टेबाजी हा भारतात गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.