शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (13:45 IST)

पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश

election
पुणे :कसबा विधानसभा मतदार संघाचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, मंगळवारपासून (31 जानेवारी) आचारसंहिता लागू झाली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाईचे आदेश सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
 
कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक, दत्तवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
 
पोलीस दल,संरक्षण दल, कारागृह विभाग, बँक सुरक्षा विभाग, अन्य केंद्रीय, शासकीय कर्मचाऱ्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. शस्त्र बाळगण्याचा परवाना असलेल्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱयांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिले.
 
सभेसाठी परवानगी बंधनकारक
 
सार्वजनिक रस्ता, ठिकाणी सभा घेण्यास पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ध्वनीक्षेपकाचा वापर रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत करण्यास मनाई करण्यात आली आहे. फिरत्या वाहनावरुन ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor