बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (09:20 IST)

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर अखेर दहशतवादाचा गुन्हा दाखल

पुणे येथील आंदोलनादरम्यान ज्यांनी कथितपणे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमध्ये देशद्रोहाचे कलमही जोडण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) ६० ते ७० संशयित कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एएनआय)ने पीएफएफच्या अनेक संशयित ठिकाणी छापे टाकले आणि त्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली. त्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी हे निदर्शने केली होती.
 
बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १०९, १२०B (गुन्हेगारी कट), १२४A (देशद्रोहाची शिक्षा), १५३A आणि B (वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत आधीच एफआयआर नोंदवले आहेत. बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर म्हणाले की, “आम्ही पीएफआय कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आज आम्ही या प्रकरणात नवीन कलमे जोडली असून पुढील तपास सुरू आहे.
 
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ने आयोजित केलेल्या निषेधादरम्यान कथितपणे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत असलेल्या आंदोलकांचा व्हिडिओ समोर आला होता. या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.
 
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा राज्यात खपवून घेतल्या जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते, तर घोषणाबाजी करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. ताब्यात घेतलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनात नेत असताना त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) काही नेत्यांनी अशा घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.