1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (21:06 IST)

Pune : सिंहगडरोड परिसरात कोयता घेऊन धुडगुस घालणार्‍या मुख्य आरोपीला बेड्या

arrest
मद्यधुंद अवस्थेत कोयत्याने दहशत माजवत पादचारी नागरिकांवर वार करण्याचा प्रयत्न करणा-या  म्होरक्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे. हल्ल्याचा थरार 28 डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी दोन धाडसी अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन एका आरोपीला पोलिसी खाक्या दाखवला त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांच्या या कार्याचे कौतुक सामाजिक माध्यमांसह सर्वत्र करण्यात आले.
 
करण अर्जुन दळवी (वय 21 रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अथर्व सुनिल लाडके (वय 20 रा. सिंहगड रोड आंबेगाव बुद्रक) यांनी फिर्याद दिली आहे. अर्थव हे 28 डिसेंबरला मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी करण आणि त्याचा साथीदार सुजित गायकवाड याने परिसरात कोयत्याने दहशत माजविली. हातातील कोयता हवेत फिरवत येणा-या जाणा-या  लोकांना धाक दाखवत दुकानांच्या शटरवर मारून राडा घातला. आरोपींनी गाड्यांवर कोयता मारुन दहशत निर्माण केल्याने लोकांनी दुकाने बंद केली. त्यानंतर आरोपींनी अर्थववर वार करून मित्र तन्मय ठोंबरे यांच्या पाठीवर कोयता फेकून मारला होता. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच सिंहगड ठाण्याच्या दोन अंमलदारांनी धाव घेत एकाला ताब्यात घेत त्याला भर रस्त्यात चोप दिला होता. पोलिस आल्याचे पाहताच आरोपी करण पसार झाला होता.

Edited By- Ratnadeep Ranshoor