आजपासून ससून रुग्णालयातही ‘कोविशिल्ड’ या लसीच्या तिसर्या टप्प्यातील मानवी चाचणी
अॅस्ट्रेझेनेका, ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियानिर्मित ‘कोविशिल्ड’ या लसीच्या तिसर्या टप्प्यातील मानवी चाचणीस बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुण्यातील ससून रुग्णालयात सोमवारपासून (दि. 21) सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुण्यातील चार रुग्णालयांसह संपूर्ण भारतात 17 ठिकाणी 1500 स्वयंसेवकांवर तिसर्या टप्प्यातील चाचणी होणार आहे. यापूर्वी सिरमची दुसर्या टप्प्यातील कोविशिल्ड लस भारती विद्यापीठात 26 ऑगस्टला दोन स्वयंसेवकांना देण्यात आली.
आतापर्यंत तेथे 34 स्वयंसवेकांना लस दिली आहे. त्यानंतर वढू बुद्रुक येथील केईएम सेंटर, ससून रुग्णालय येथेही लस देण्यात आली आहे. दुसर्या टप्प्यातील लस ससूनमध्ये 5 स्वयंसेवकांना, तर केईएममध्ये 35 जणांना देण्यात आली. अशा प्रकारे भारतात 17 ठिकाणी एकूण 100 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे.
चाचणीबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, की तिसर्या टप्प्यातील लसीच्या चाचणीस सोमवारपासून सुरुवात होत असून त्यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू केलेली आहे. आतापर्यंत 49 स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह चाचणी, अँटीबॉडी चाचणी करण्यात येईल. ती निगेटिव्ह आल्यावरच त्यांना डोस देण्यात येणार आहे.